पीक विमा कंपन्याद्वारे २.३६ कोटींचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:27 AM2019-04-29T01:27:42+5:302019-04-29T01:28:04+5:30
गतवर्षीचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला. १३ तालुक्यांत ५० पैशांचे आत पैसेवारी असल्याने दुष्काळस्थिती जाहीर झालेली आहे. अशा स्थितीत ७७ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४१ लाखांचा पीक विमा हप्ता भरणा केला.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षीचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला. १३ तालुक्यांत ५० पैशांचे आत पैसेवारी असल्याने दुष्काळस्थिती जाहीर झालेली आहे. अशा स्थितीत ७७ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४१ लाखांचा पीक विमा हप्ता भरणा केला. प्रत्यक्षात ५ हजार ३७१ शेतकºयांना ४ कोटी ५ लाख ९६ हजारांची भरपाई कंपन्यांद्वारे जाहीर करण्यात आली. दुष्काळग्रस्त तालुक्यांना पीक विमा भरपाई तर दूरच, शेतकरी हप्ता इतकीही भरपाई विमा कंपनीद्वारे मिळालेली नाही. त्यातही २ कोटी ३६ लाखांचा डल्ला मारल्याचे वास्तव आहे.
सलग दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविम्याचे संरक्षण मिळेल, या आशेने सन २०१७-१८ हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ६५६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. योजनेत समाविष्ट पिकांपैकी उडीद, मूग, भुईमूग, भात, तीळ, खरीप ज्वार, सोयाबीन आदी पिकांची भरपाई कंपनीस्तरावर आता जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कपाशी व तूर व्यतिरिक्त७७ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४१ लाख ३ हजारांचा विमा हप्ता भरणा केला होता. या तुलनेत ५ हजार ३७१ शेतकऱ्यांना ४ कोटी ५ लाख ९६ हजारांची पीक भरपाई जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच अमरावती या दुष्काळी जिल्ह्यात ७२ हजार २१७ शेतकऱ्यांना त्यांनी भरणा केलेल्या विमा हप्त्या इतकीही भरपाई देण्यात आलेली नसल्याची बाब उघड झाली आहे. शेतकऱ्यांनी भरणा केलेल्या विमा हप्तयाच्या तुलनेत विमा कंपन्यांनी भरपाई न देता दोन कोटी ३५ लाखांचा डल्ला मारल्याचा आरोप होत आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे तसेच पिकांच्या नुकसानीच्या कठीण काळात आर्थिक स्थैर्य वाढविणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची अशी ही योजना आहे. मागच्या खरिपात पेरणीपासूनच पावसात खंड राहिला. त्यामुळे अल्प कालावधीतील सोयाबीन, मूग, उडीद आदी पीक बाद झालीत. खरिपाची पैसेवारी धारणी वगळता सर्व तालुक्यांत ५० पैशांच्या आत आहे. त्यामुळे पाच तालुक्यांत दुष्काळ व आठ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती शासनाने यापूर्वीच जाहीर केलेली आहे. पीक विमा योजनेत सहभागी सर्वच शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा असताना कंपन्यांनी घात केला. पीक विमा काढण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येतो. बँकाही पीक कर्जामधून परस्पर विमा हप्ता कपात करतात. प्रत्यक्षात कंपन्यांची तुंबडी भरण्याचा हा प्रकार ठरत असल्याचा आरोप होत आहे.
योजनेत १,३८,६५६ शेतकऱ्यांचा सहभाग
पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ६५६ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये ६२ हजार ६८९ शेतकरी कर्जदार व ७५ हजार ९६९ शेतकऱ्यांचा ऐच्छिक सहभाग आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ८,४१३, भातकुली १२,९५३, नांदगाव खंडेश्वर २४,६८०, चांदूर रेल्वे ६७४६, धामणगाव रेल्वे ७,५८२, मोर्शी ७,८४४, वरूड २,२८६, तिवसा ५५४७, चांदूर बाजार ७,९९३, तिवसा ५,५४७, चांदूर बाजार ७९९३, अचलपूर ७,७९६, दर्यापूर २६,९७०, अंजनगाव सुर्जी १६,८०१, चिखलदरा १,१६२ व धारणी १,१८३ शेतकऱ्यांचा सहभाग आहे.
सोयाबीन, मूग, उडीद सर्वाधिक बाधित तरीही ठेंगा
गतवर्षीच्या खरिपात पेरणीपासूनच पावसाची दडी असल्याने १०० दिवसांच्या कालावधीतील सोयाबीन व ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडीद पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीनसाठी ६० हजार ७३६ शेतकऱ्यांनी ७१ हजार ४४४ हेक्टरसाठी विमा काढला व पाच कोटी ७१ लाखांचा विमा हप्ता भरणा केला. प्रत्यक्षात ४ हजार ६८७ शेतकऱ्यांना ३ कोटी ८८ लाख ९७ हजाराची भरपाई देण्यात आलेली आहे. उडदासाठी ५३०० पैकी ८१ शेतकऱ्यांना तर मुगासाठी १०,६७८ शेतकºयांपैकी ५३२ शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे.