नागपूरहून आणला ‘म्याव म्याव’; चौघे जाळ्यात, २३.६ ग्रॅम एमडी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:45 PM2023-07-28T15:45:54+5:302023-07-28T15:47:05+5:30
नांदगाव पेठ ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती : तीन दिवसांपूर्वी भिवंडीहून होणारी एमडीची तस्करी उघड केल्यानंतर आता नागपुरातून आलेली एमडीची खेप पकडण्यात शहर पोलिसांना यश आले. नागपूरहून अमरावतीत एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिस आयुक्तांचे विशेष पथक ‘सीआययू’ने २६ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांच्या कबुलीनुसार त्यांच्या एका स्थानिक साथीदारालाही जेरबंद करण्यात आले. त्या तिघांच्या ताब्यातून २३.६ ग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन दुचाकी व दोन मोबाइल असा एकूण ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात तिघांसह नागपूरमधील कोंढाळी येथील एकाला आरोपी करण्यात आले आहे.
अब्दुल सलमान अब्दुल कदीर (२५, रा. मुजफ्फरपुरा), अब्दुल फैजान ऊर्फ मोनू अब्दुल रौफ (२०, रा. गौसनगर) व सय्यद महेदिमिया सय्यद पीर (२२, रा. जमील कॉलनी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात सय्यद आसीफ (रा. कोंढाळी, जि. नागपूर) यालाही आरोपी करण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री दोन तरुण दुचाकी (एमएच २७ सीएल ५५१५) ने मोझरीकडून नांदगाव पेठ मार्गे अमरावती येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या विशेष पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून सदर दुचाकीस्वार अब्दुल सलमान व अब्दुल फैजान यांना ताब्यात घेतले. अंगझडतीत त्यांच्याजवळ १९.६ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आली. त्यानुसार त्यांना अटक करून एमडी ड्रग्ज, दोन मोबाइल व दुचाकी असा एकून २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींनी दिली कबुली
ती एमडी ड्रग्ज आपण कोंढाळीच्या सय्यद आसीफ याच्याकडून आणल्याचे आरोपींनी सांगितले. या आधी आणलेल्या ड्रग्जपैकी काही एमडी सय्यद महेदिमिया याच्याकडे असल्याचेही त्यांनी चौकशीत सांगितले. त्यानुसार सय्यद महेदिमिया याला अटक करून त्याच्याकडून ४ ग्रॅम एमडी ड्रग्ज व दुचाकी असा एकूण १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. चारही आरोपींविरुद्ध नांदगाव पेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सलग दुसरी यशस्वी कारवाई
भिवंडीहून अमरावतीत एमडीची तस्करी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने २५ जुलै रोजी अटक केली होती. त्या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विशेष पथकाने एमडी ड्रग्ज तस्करी व विक्रीप्रकरणी दुसरी कारवाई केली. दरम्यान, बुधवारची कारवाई विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सुनील लासूरकर आदींनी केली.