२४ लघुप्रकल्प ’ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:49 AM2019-09-03T00:49:38+5:302019-09-03T00:49:58+5:30
जिल्ह्यात १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत ६५३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६५.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही १०२ टक्केवारी आहे. याच दिनांकापर्यंत मागील वर्षी ४३७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८२ टक्के पाऊस झालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामात जून, जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्टपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने जिल्ह्याची सरासरी पार झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत २२९ मिमी पाऊस अधिक झालेला आहे. जोरदार पावसाने जिल्ह्यातील चार मध्यमसह २४ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत ६५३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६५.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही १०२ टक्केवारी आहे. याच दिनांकापर्यंत मागील वर्षी ४३७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८२ टक्के पाऊस झालेला आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ५७०.१ मिमी, भातकुली ३५७.३, नांदगाव खंडेश्वर ५५३.७, चांदूर रेल्वे ६५६.९, धामणगाव रेल्वे ६८७.४, तिवसा ५१५.९, मोर्शी ५३६.९, वरुड ५८१, अचलपूर ५८८.५, चांदूर बाजार ७६१, दर्यापूर ५००.७, अंजनगाव सुर्जी ४६५.८, धारणी ११२९.८ व चिखलदरा तालुक्यात १४२७.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
या आठवड्यात ५ तारखेपर्यंत जिल्ह्यासह विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशवर ३.४ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ते नैऋत्येकडे झुकलेले आहेत. जिल्ह्यासह विदर्भात ५ सप्टेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ व श्री शिवाजी कृषी महाािवद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.
जिल्ह्यात हे लघुप्रकल्प तुडुंब
जिल्ह्यात सद्यस्थितीत नांदगाव तालुक्यातील पिंपळगाव, तिवसा तालुक्यातीळ सुर्यगंगा, अचलपूर तालुक्यातीळ खतिजापूर, गोंडवाघोली, गोंडविहीर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सावरपाणी, टोंगलफोडी.चांदूर रेल्वे तालुक्यात टाकळी , मोर्शी तालुक्यात त्रिवेणी, वरुड तालुक्यात नागठाणा, धारणी तालुक्यात खारी, गावलानडोह, सावलीखेडा, मांडवा, रभांग, बोबदो, लवादा, सालई, बेरदा, गंभेरी, जूटपाणी, मोगर्दा, नांदूरी व चांदूर बाजार तालुक्यात चारगड प्रकल्प सदयस्थितीत ओव्हरफ्लो झालेले आहेत. तर २३ लघुप्रकल्पात ५० ते ८० टक्कयांपर्यत जलसाठा आहे.