२४ हजार विद्यार्थी राहणार गणवेशापासून वंचित
By admin | Published: June 17, 2017 12:14 AM2017-06-17T00:14:35+5:302017-06-17T00:14:35+5:30
शासनाच्या नव्या धोरणानुसार शालेय विद्यार्थ्याला गणवेशासाठी मिळणारे पैसे आई व मुलाच्या संयुक्त खात्यात जमा होणार आहे.
मेळघाटातील परिस्थिती : आई-मुलाचे खाते उघडण्यासाठी पैसेच नाही
पंकज लायदे। लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शासनाच्या नव्या धोरणानुसार शालेय विद्यार्थ्याला गणवेशासाठी मिळणारे पैसे आई व मुलाच्या संयुक्त खात्यात जमा होणार आहे. मात्र मेळघाटातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांचे खाते उघडलेच नाही. यामुळे मेळघाटातील सुमारे २४ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.
मेळघाटातील धारणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १७१ शाळेतील इयत्ता १ ते ८ वीतील २४ हजार ५४ विद्यार्थी पालकांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे गणवेशापासून वंचित राहणार आहेत. २६ जूनला शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर शाळेत येणारा विद्यार्थी हा गणवेशातच शाळेत आला पाहिजे. त्याकरिता शासनाने ही योजना सुरू केली. परंतु या योजनेकरिता आई व विद्यार्थी यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत संयुक्त खाते उघडण्याचे सांगितले आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांची परिस्थिती व बँकेत खाते उघडण्यासाठी लागणारा खर्च त्यामुळे अद्यापही खाते उघडलेच नाही. परंतु खाते उघडण्यास गेलेल्या पालकांना बँकेतील तौबा गर्दी पाहून आल्यापावली परत जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांचे संयुक्त गणवेश
खाते उघडणे अशक्यच
धारणीत राष्ट्रीयीकृत बँकेच्या फक्त तीन शाखा आहेत. या तीनही शाखांत १७० गावांतील नागरिकांचे विविध प्रकारचे खाते आहेत. त्या खातेधारकांनाच बँकांकडून व्यवस्थित सुविधा पुरविली जात नाही, त्यामुळे विद्यार्थी गणवेश खाते उघडणे तर दूरच आहे.
राज्य शासनाचा निधीही अप्राप्त
राज्य शासनाचा गणवेश खरेदीबाबतचा कुठलाही निधी अद्याप प्राप्त झाला नाही. परंतु सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुकास्तरावरील विविध "हेड"वरील पैसा हा गणवेश खरेदी करण्याकरिता खर्च करण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अमरावती यांचे पत्र पं.स. गटशिक्षणाधिकाऱ्याला प्राप्त झाले आहे.