मेळघाटातील २४ पाड्यांमध्ये आजही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:30 AM2019-04-09T11:30:10+5:302019-04-09T11:31:59+5:30

जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही.

24 villages of Melghat still in darkness | मेळघाटातील २४ पाड्यांमध्ये आजही काळोख

मेळघाटातील २४ पाड्यांमध्ये आजही काळोख

Next
ठळक मुद्देव्यथा शापित मेळघाटचीआदिवासींच्या पिढ्यांच्या नशिबी अंधार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. नातू-पणतूही रात्रीचा अंधार झेलत आहेत. आयुष्यातला काळोख केव्हा दूर होणार, हे सांगणे कठीण असल्याचे मत अतिदुर्गम चुनखडी येथील गानू बेठेकर या ६५ वर्षीय वृद्धाने व्यक्त करीत आपल्या व्यथा सांगितल्या.
देश जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत असताना, धारणी व चिखलदरा तालुक्याचा समावेश असलेल्या मेळघाटातील २४ आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याची ७२ वर्षे उलटल्यानंतरही वीज पोहोचलेली नाही.
धारणी व चिखलदरा तालुक्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या योजना शासनस्तरावरून पाठविल्या जातात. मात्र, वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा कुठपर्यंत पोहोचल्या, तर अजूनही २४ गावांमध्ये विजेची व्यवस्था झालेली नाही. धारणी तालुक्यातील रंगूबेली, ढोकळा, खामदा, किन्हीखेडा व कुंड या पाच गावांसह चिखलदरा तालुक्यातील एकताई, सलीता, भांडुम, चोबिता, लाखेवाडा, बोदू, मारिता, खडीमल, बिच्छुखेडा, चुनखडी, माडीझडप, नवलगाव, माखला, पिपल्या, टेंभ्रू, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा आदी गावांचा समावेश आहे. वीजपुरवठा हा येथील आदिवासींसाठी परवलीचा शब्द बनला आहे.

कंदील, बॅटरी आणि सौरदिवा
व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने मेळघाटातील या अतिदुर्गम गावांना कोअर झोन आणि विविध कारणास्तव विद्युत पुरवठा पोहोचला नाही. शेतात जागली तसेच मुलांचा अभ्यास पूर्वी कंदील व बॅटरीच्या उजेडात व्हायचा. आता काही प्रमाणात सौरदिवे खरेदी करून त्यांनी वापरात आणले आहेत.

शासनदरबारी उदासीनता
चिखलदरा तालुक्यातील एकताई, सुमिता, सलीता, भांडुम, चोबिता व लाखेवाडा या सहा गावांमध्ये डीपीडीसी अंतर्गत प्रस्तावित वीजपुरवठ्याची कामे अडकून पडली आहे. माडीझडप, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा ही पाच गावे व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात येतात. हातरूण येथील उपसरपंच नानकराम ठाकरे, चिलाटी येथील मेळघाट मित्र या स्वयंसेवी संघटनेचे रामेश्वर फडसह आदिवासी युवकांनी महावितरणला निवेदन ते निवडणुकांवर बहिष्कारापर्यंत अनेक आंदोलने केली. मात्र, काळोख कायम आहे.

४२ गावांना मध्य प्रदेशातून पुरवठा, लाखोंचा घाटा
चिखलदरा तालुक्यातील सरिता सबस्टेशन अंतर्गत ४२ गावांना मध्य प्रदेशातून विद्युत पुरवठा केला जातो. पूर्वी येथे ३८०० विद्युत ग्राहक होते; आता केवळ १३०० ग्राहक आहेत. महावितरण एक कोटी रुपये महिन्याची वीज विकत घेते, तर केवळ तीन लाखांपर्यंत वसुली होत असल्याने लाखो रुपये घाट्याचे वास्तव आहे. वीजचोरी करताना अपघात होऊन आदिवासींना जीव गमवावा लागत आहे

Web Title: 24 villages of Melghat still in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज