२४४८ सदस्यपदे महिलांसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:08+5:302020-12-15T04:30:08+5:30
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. १,८२३ प्रभागातील ४८९६ सदस्यपदांसाठी असलेल्या या निवडणुकीतील २४४८ सदस्यपदे ...
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. १,८२३ प्रभागातील ४८९६ सदस्यपदांसाठी असलेल्या या निवडणुकीतील २४४८ सदस्यपदे ही महिलांसाठी राखीव आहेत. या पदावर योग्य उमेदवार देताना राजकीय पक्षांची चांगलीच कसरत होत आहे. मंगळवारी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध होत असल्याने जिल्हा प्रशासनाद्वारे पूर्वतयारीला वेग आलेला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची पूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी शौलेश नवाल यांच्याकडे सोपविली आहे. अंतिम मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज उचल व दाखल करता येणार आहे. कोरोनाकाळात प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती. कर्मचाऱ्यांची कमतरता असेल तेथे विभागीय आयुक्तांशी चर्चा करून ते उपलब्ध करण्याच्या सूचना आहेत.
बॉक्स
उमेदवारी अर्जाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे
निवडणुकीत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्याचे आयोगाचे आदेश आहेत. याची जबाबदारी जिल्हाधिकारी, तहसीलदार व आरओ यांना सोपविण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत राहणार आहे.
बॉक्स
सदस्यसंख्येवर निवडणूक खर्चमर्यादा
ग्रामपंचायत निवडणुकीत संबंधित ग्रामपंचायतींचे सदस्यसंख्येवर निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. ग्रामपंचायतीची ७ ते ९ सदस्यसंख्या असल्यास २५ हजार, ११ ते १३ सदस्य असल्यास ३५ हजार व १५ ते १७ सदस्यसंख्या असल्यास ५० हजार अशी निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. निवडणूक जाहीर झाल्याच्या एक महिन्याच्या आता उमेदवाराला त्याचा निवडणूक खर्च संबंधित अधिकाऱ्याकडे द्यावा लागणार आहे.