२५ ग्रामपंचायतींमध्ये झाले ग्रामसेवकाविना ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:15 AM2018-08-17T01:15:47+5:302018-08-17T01:16:07+5:30
तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
चिखलदरा तालुक्यात दीडशेवर गावांसाठी ५४ ग्रामपंचायती आहेत. त्यांचा कारभार केवळ २९ ग्रामसेवक सांभाळतात. त्यामुळे स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, महाराष्ट्र दिन सोहळ्याला ध्वजारोहणासाठी सचिव मिळत नसल्याची बोंब कायम आहे. चिखलदरा तालुका विस्ताराने सर्वाधिक मोठा असल्याने ८०ते १०० किलोमीटर अंतरावरील तीन ते चार ग्रामपंचायतीचा कारभार एका सचिवाकडे आहे. प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान चार ते पाच गावे आहेत. बुधवारी झालेल्या १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनी तब्बल २५ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची दरवर्षीप्रमाणे मदत घेण्यात आली. तालुक्यासाठी ग्रामसेवकांची ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी तीन ग्रामसेवक निलंबित, तर तीन बेपत्ता आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई सुरू आहे. प्रत्यक्षात आदिवासींच्या पाड्यांचा विकास कुठे थांबला, याची चिकित्सा स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी गाठण्यापूर्वी होणे गरजेचे ठरले आहे.
शासकीय योजनांसाठी ससेहोलपट
वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ता या मूलभूत सुविधांचा अभाव मेळघाटच्या नशिबी आजही आहे. कुपोषणाने बालमृत्यूच्या आकडेरीत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य व बाल विकास प्रकल्प कार्यालयाची यंत्रणा त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च गेला तरी कुठे, असे म्हणायची वेळ आली आहे. अतिदुर्गम हतरू परिसरातील २० गावांमध्ये आजही रस्ता, वीज, पाणी या सुविधा बेपत्ता आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात सर्वाधिक टँकर जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात लागतात.