२५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १.२ लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:17 AM2021-08-28T04:17:39+5:302021-08-28T04:17:39+5:30
नांदगाव खंडेश्वर : शहरात गुरुवारी रात्री दोन घरफोडीच्या घटना घडल्या. यात २५ ग्रॅम सोन्याचे दागिने व १ लाख २ ...
नांदगाव खंडेश्वर : शहरात गुरुवारी रात्री दोन घरफोडीच्या घटना घडल्या. यात २५ ग्रॅम सोन्याचे दागिने व १ लाख २ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
गुरुवारी रात्री १ वाजताच्या सुमारास येथील खंडेश्वर नगरी २ मधील रहिवासी राम नागनाथ महाजन या शिक्षकाच्या घरी अज्ञातांनी घरात घुसून गळ्यातील सोन्याची पोत व कानातील रिंग असे २५ ग्रॅम सोने व ५७ हजारांची रोकड असा १ लाख ६९ हजारांचा ऐवज लंपास केला. त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी काढून चोरटे महाजन यांची पत्नी झोपलेल्या रूममध्ये शिरले. त्यांना जाग आली व आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी त्यांच्या पाठीवर सळीने मारहाण केली. कपाटातील रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले. दरोडेखोराच्या हातात लोखंडी टॉमी, लोखंडी सळी, चाकू होते. त्यानंतर चोरटे आले त्याच दाराने बाहेर पडले व बाहेरून दाराची कडी लावून घेतली. दरोडेखोर हिंदी भाषेत बोलत असल्याचे सांगितले.
याच रात्री येथून नजीकच्या प्रमोद नगर मधील प्रवीण दामोदर इचे यांच्या घरी अज्ञात चोरटे आत शिरले. प्रवीण यांना जाग आला असता त्यांना चोरट्यांनी दमदाटी केली व घरातील सुमारे ४५ रुपये लंपास केले. बाहेरून दाराची कडी लावून चोरटे पसार झाले. चोरट्यांच्या हातात लोखंडी सळी होती व ते हिंदी भाषेत बोलत होते तसेच ते तोंड झाकून असल्यामुळे चोरट्यांचे फक्त डोळेच दिसत होते. बनियान व चड्डी असा त्यांचा पेहराव होता, असे सांगितले.
नांदगाव पोलिसांनी रात्रीच घटनास्थळ गाठले. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील घटनास्थळी दाखल झाल्या. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ४५७, ४५८, ३९२, ३९५, ३९७ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस तपास ठाणेदार हेमंत ठाकरे करीत आहेत.