लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी आता २५ तास मदत कक्ष सीईओ संजीता मोहपात्रा यांचा पुढाकार
By जितेंद्र दखने | Published: July 12, 2024 09:21 PM2024-07-12T21:21:35+5:302024-07-12T21:24:42+5:30
महिला बालविकास भवनात सुविधा
अमरावती : राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या लाभार्थ्याना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये आणि त्यांच्या मनात ज्या शंका आहेत. त्यांचे त्वरित समाधान करण्यासाठी आता "महिला बाल विकास भवन"गर्ल्स हायस्कूल चौक येथे २४ तास महिलांच्या सुविधेसाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचा हेल्पलाइन नंबर ८४३२५२०३०१ असा आहे. या नंबर वर लाभार्थी महिला कधीही संपर्क साधता येईल अशी माहिती सीईओ संजीता मोहपात्रा यांनी दिली.
गत पंधरा दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला सुपर करण्यासाठी वेळोवेळी शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येत ही प्रक्रिया आता अतिशय सोपी केली आहे.आजपर्यत जिल्ह्यातील ६० हजार महिलांनी या योजनेमध्ये नोंदणी केली आहे. तरीसुद्धा काही महिलांच्या मनात या योजनेविषयी गैरसमज आहेत. काही महिलांना कोणती प्रमाणपत्र लागतात याविषयी शंका आहे. तर काही ठिकाणी महिला आजही गर्दी करत आहे. हे टाळण्यासाठी आणि महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी महिला बालविकास भवन येथे महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून ज्यांना या योजनेविषयी कोणत्याही शंका असतील त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होईल. यासाठी महिला बालविकास विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ कर्मचाऱ्याची नियुक्ती या मदत कक्षात केली आहे.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्याचबरोबर त्यांच्या मनात असलेल्या शंका तात्काळ निराकरण व्हावे यासाठी हा कक्ष स्थापन केलेला असून हा कक्ष २४ तास सुरू राहील अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारा अमरावती जिल्हा राज्यात पहिला आहे.
संजीता मोहपात्रा,- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती.