२५ घरांची छपरे उडाली आदिवासी उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:24 AM2018-06-22T01:24:59+5:302018-06-22T01:24:59+5:30
तालुक्यातील बदनापूर, सोलामुह आणि कालापाणी या तीन गावांना गुरुवारी दुपारी अडीच वाजता चक्रीवादळ व पावसाने झोडपून काढले. यात २५ घरांचे छप्पर पूर्णपणे उडाले, तर जवळपास २०० घरांचे अंशत: नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील बदनापूर, सोलामुह आणि कालापाणी या तीन गावांना गुरुवारी दुपारी अडीच वाजता चक्रीवादळ व पावसाने झोडपून काढले. यात २५ घरांचे छप्पर पूर्णपणे उडाले, तर जवळपास २०० घरांचे अंशत: नुकसान झाले. परिसरातील विद्युत खांब झोपले तसेच अनेक वृक्ष उन्मळून पडले. मात्र, जीवितहानी झाली नाही. आमदार, पं.स. सभापती आदी पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी गावाकडे धाव घेतली.
चिखलदरा तालुक्यातील बदनापूर, कालापानी, सोलामुह आणि परिसरात गुरुवारी दुपारी मुसळधार पावसासह चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. बदनापूर येथे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. तेथील सुनील बेलसरे, रामलाल बेलसरे, देविदास धांडे, श्यामलाल चतुरकर, सहदेव बेलसरे, रामचंद्र काळे, सुरेश पाथरे, सखाराम बेलसरे, हिरामण सावरकर, गजानन शेलूकर, मान्सू झामरकर आदी जवळपास २५ आदिवासींच्या घराचे छप्पर उडाले. घरातील सर्व साहित्य पूर्णत: नष्ट झाल्याने आदिवासी उघड्यावर आल्याचे चित्र आहे. बदनापूर येथील विद्युत पुरवठा करणारे खांब जमीनदोस्त झाले, तर जवळपास दहा झाडे उन्मळून पडली.
पदाधिकाऱ्यांची भेट
चक्रीवादळाच्या तडाख्याने आदिवासींची दाणादाण उडाल्याची माहिती मिळताच आ. प्रभुदास भिलावेकर, पं.स. सभापती कविता काळे, दादा खडके, बबलू काळे, यशवंत काळे, दिनेश चव्हाण, सुमीत चावरे आदी पदाधिकाऱ्यांनी गावांना भेटी दिल्या. आदिवासींच्या निवास-भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे आ. प्रभुदास भिलावेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बियाणे भिजले, गर्भवती बचावली
आदिवासींनी उसनवारी घेऊन पेरणीसाठी आणलेले बियाणेसुद्धा छप्पर उडाल्याने मातीमोल झाले. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी व बियाण्यासाठी पुन्हा उसनवारी कुठून घ्यावी, असा प्रश्न श्यामलाल चतुर या शेतकऱ्याने उपस्थित केला. बदनापूर येथील एका घरात बसलेल्या गर्भवती महिलेच्या अंगावर छप्पर पडत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ तिला सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला