२.५ लाख शेतकरी कर्जापासून वंचित?

By admin | Published: April 11, 2017 12:30 AM2017-04-11T00:30:50+5:302017-04-11T00:30:50+5:30

कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे.

2.5 lakh farmers deprived of loans? | २.५ लाख शेतकरी कर्जापासून वंचित?

२.५ लाख शेतकरी कर्जापासून वंचित?

Next

कर्जमाफीच्या चर्चेचे ‘साईड इफेक्ट्स’ : बँकांची वसुली प्रभावित, १२६८ कोटी रुपये थकीत
अमरावती : कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अडीच लाख शेतकरी थकबाकीदार झाल्याने यंदाच्या खरिपासाठी पुन्हा कर्ज मिळण्याची शक्यता नाही. यावर शासनाने तोडगा न काढल्यास हे सर्व शेतकरी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना मागील वर्षी खरिपाचे पीककर्जवाटप करण्यात आले. यापैकी किमान एक लाख शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे हेसर्व शेतकरी थकबाकीदार होणार आहेत. आणखी दोन महिन्यांपर्यंत याशेतकऱ्यांना मागील कर्ज भरता येते व नव्याने कर्जास पात्र होता येते. मात्र, त्यांना काही सवलतींना मुकावे लागणार आहे. यासह ३१ मार्चपूर्वी मध्यम व दीर्घमुदती कर्जाचेदेखील एक लाख ६७ हजार ४२६ शेतकरी थकबाकीदार आहेत. अशा जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी थकीत कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप कर्जापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे.
विधिमंडळ सभागृह ते गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आता कर्जमाफी होणारच, याआशेवर शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. किंबहुना शेतमालास हमी इतकाही भाव नाही. यामुळे उत्पादनखर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्याला कर्जमाफीच्या चर्चेचे बळ मिळाल्याने बँकांची वसुली प्रभावित झाली. शेतकरी थकबाकीदार असल्याने बँका त्यांना कर्ज देण्यास उघडपणे नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन लाखांवर शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

अकोल्यात तोडगा, जिल्ह्यात केव्हा ?
अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या व्याजाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप कर्जाचे वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला व त्याला मान्यता मिळाली. जिल्ह्यातदेखील जिल्हा सहकारी बँकेने याच निर्णयाचा कित्ता गिरवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मागीलवर्षीपेक्षा २०४.६८ कोटींनी लक्ष्यांक कमी
जिल्ह्यात यंदाच्या खरीप व रबी कर्जवाटपासाठी १९४१ कोटींचा लक्ष्यांक आहे. मागील वर्षी २१४५.६८ कोटींचा लक्ष्यांक होता. त्यातुलनेत यंदा २०४.६८ कोटींचा लक्ष्यांक कमी आहे. वास्तविक दरवर्षी लक्ष्यांकात किमान १० टक्के वाढ गृहित धरली जाते. यंदा मात्र शेतकऱ्यांचे कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने कर्जवाटपाच्या सुरुवातीलाच बँकांनी नन्नाचा पाढा वाचल्याने लक्ष्यांक कमी केल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जासाठी अडचणी उद्भवणार आहेत. यासाठी वरिष्ठ स्तरावर संवाद सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल. ३१ मेपूर्वी कर्जवाटपाच्या सूचना आहेत.
- गौतम वालदे,
जिल्हा उपनिबंधक

Web Title: 2.5 lakh farmers deprived of loans?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.