मिळणार! पीकविम्याचे २५ टक्के महिनाभरात; ४१ मंडळांसाठी अधिसूचना
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 24, 2023 07:57 PM2023-09-24T19:57:25+5:302023-09-24T19:57:45+5:30
सोयाबीनसाठी जिल्हाधिकाऱ्यांद्वारा जारी; भरपाई देण्याचे पीकविमा कंपनीला आदेश
गजानन मोहोड, अमरावती : तालुका समितीच्या पाहणीत सात तालुक्यांतील ४१ महसूल मंडळात सात वर्षांतील सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा समितीच्या बैठकीतही यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बाधित ४१ महसूल मंडळांसाठी अधिसूचना जाहीर केली. ती कंपनीला बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांना महिनाभरात पीकविमा भरपाईचा २५ टक्के अग्रिम मिळण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून तीन आठवडे विलंबाने आल्यामुळे पेरणीही विलंबाने झाल्या. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात २१ पेक्षा जास्त दिवस पावसात खंड राहिला आहे. त्यामुळे सोयाबीनची वाढ खुटंली व बहर गळाला. याशिवाय पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला, तापमानवाढीनेही नुकसान झालेले आहे. त्यामुळे ६ सप्टेंबरच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दर्यापूर, अंजनगाव सुर्जीसह सर्व तालुक्यातील सोयाबीन पिकाची पाहणी संयुक्त समितीद्वारा करण्याचे आदेश दिले होते.