दीड महिन्यात विदर्भात नैसर्गिक आपत्तीचे २५ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 06:31 PM2018-07-18T18:31:20+5:302018-07-18T18:31:26+5:30
२३४ गावे बाधित : ४,५०८ नागरिक विस्थापित, ३,७२५ हेक्टर जमीन खरडली
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १६ जुलैपर्यंत नेसर्गिक आपत्तीमुळे विभागातील २५ नागरिकांचा बळी गेला. यामध्ये २४ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने २३४ गावे बाधित झालीत, तर १,५१३ कुटुंबांतील ४,५०८ नागरिक बेघर झाले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ३,७३५ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
विभागात १ जून ते १७ जुलै या कालावधीत बुलडाणा वगळता अमरावती, यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली. सरासरीच्या १३० टक्के पाऊस अधिक झाला. यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे १६ जण वाहून गेले, तर वीज पडल्याने ९ असे एकूण २५ नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे २३४ गावांत १,५१३ कुटुंबांतील ४,५०८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १३९ कुटुंबांतील १३९, अकोला जिल्ह्यात ३५ कुटुंबातील २,७७६, व यवतमाळ जिल्ह्यात ६८० कुटुंबातील १,५९३ व्यक्ती बाधित झाल्यात. या दीड महिन्याच्या कालावधीत २५ नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ ९, बुलडाणा ३, व वाशिम जिल्ह्यात ५ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १३, अकोला जिल्ह्यातील ६, व अमरावती जिल्ह्यातील ५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदीनाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ३,७२५ हेक्टरमधील शेतजमिन खरडल्या गेली, तर अकोला जिल्ह्यात २९४, यवतमाळ २८ व वाशिम जिल्ह्यातील २१ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मृताच्या वारसांना ६० लाखांची मदत
या आपत्तीमध्ये २५ नागरिकांचा बळी गेला यामध्ये १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ६० लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ २४ जनावरे मृत झाली. यापैकी १३ प्रकरणांत ३.४८ लाखांची मदत देण्यात आली. ४६ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी १५ प्रकरणांत ४५ हजारांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी २९ जनावरे दगावली. यामध्ये २० प्रकरणांत ४.७६ लाखांची मदत देण्यात आली.
आपत्तीमध्ये १,८१६ घरांची पडझड
या दीड महिन्याच्या कालावधीत ५२ घरांची पूर्ण, २९ घरांची अंशत:, १८१६ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ५१ हजारांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे ११ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने ९ व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ५ व्यक्ती अस्या एकूण २५ नागरिकांचा बळी गेला आहे.