साडीने बांधले हातपाय-तोंड, अन् लुटले सर्वस्व; अमरावतीतील खळबळजनक घटना
By प्रदीप भाकरे | Updated: December 14, 2022 13:17 IST2022-12-14T13:13:02+5:302022-12-14T13:17:21+5:30
आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना

साडीने बांधले हातपाय-तोंड, अन् लुटले सर्वस्व; अमरावतीतील खळबळजनक घटना
अमरावती : नेहमीप्रमाणे घराबाहेर पडून मजुरीसाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेचे अपहरण करून तिचेवर सलग तीन दिवस अतिप्रसंग करण्यात आला. ९ डिसेंबर रोजी दुपारी १ ते १२ डिसेंबर या कालावधीत ती अत्याचाराची मालिका घडली. त्या घटनेप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास आरोपी हिेरालाल साबुलाल जामुनकर (३०, खडीमल) याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी ही ९ डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घरून मजुरीचे काम करण्यास जात असताना थोडे दूर गेल्यानंतर आरोपी हिरालाल जामुनकर याने दुपारच्या वेळी रस्त्यावर कोणी नसल्याने तिला अडविले. आरोपीने फिर्यादी विवाहितेचे तोंड दाबून तिला ओढत जंगलात नेले. तिच्याच साडीने तिचे हात पाय तोंड बांधून ठेवले. दरम्यान, रात्र झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी बळजबरी केली. आरोपीने तीन दिवसांत दोन-तीन वेळा जबरदस्ती शारीरिक संबंध केल्याची तक्रार पिडिताने नोंदविली. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी सकाळी आरोपींच्या शोधार्थ एक पथक पाठविण्यात आल्याचे चिखलदरा पोलिसांनी सांगितले.