जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठीचा २५ वर्षांचा लढा संपला; विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:56 PM2019-06-14T19:56:40+5:302019-06-14T19:58:25+5:30
जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
वाढोणा रामनाथ (अमरावती) : १९९३ साली दोन एकर शेत शासनाने पाझर तलावासाठी संपादित केले. त्याचे अवघे १३ हजार रुपये हाती ठेवले. तेव्हापासून वाढीव मोबदल्यासाठी प्रशासनाविरुद्ध सुरू केलेला लढा मृत्यूने संपला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील अनिल महादेव चौधरी यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
अनिल चौधरी (४५) यांच्याकडे १४ एकर शेती होती. त्यापैकी दोन एकर शेत गावतलावाकरिता प्रशासनाने १९९३ मध्ये ताब्यात घेतले. त्यावेळी जेमतेम १३ हजार रुपये त्यांच्या हातावर ठेवण्यात आले. १९९५ मध्ये अनिल चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाढीव मोबदल्यासाठी अर्ज केला. २५ वर्षांत अनेकदा चकरा घालूनही त्यांच्या अर्जावर विचार झाला नव्हता. दरम्यान, त्यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली.
अलीकडे अनिल चौधरी यांच्या शेतालगत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. अनिल चौधरी यांच्या विरोधाला न जुमानता या कामावरील ठेकेदाराने त्यांच्या शेतात मुरूम काढण्याकरिता जेसीबीने मोठा खड्डा केला. यानंतरही या शेतातून उत्खनन सुरूच होते. ते बंद करण्यात यावे, ही मागणी घेऊन त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले ते हाती कीटकनाशकाची बॉटल घेऊनच. यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे विमनस्क स्थितीत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याच दालनासमोर विष प्राशन केले व अंगावर पेट्रोल ओतले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
पत्नीचीही प्रकृती खालावली
अनिल चौधरी यांच्या मनमिळावू व्यक्तिमत्त्वामुळे गावकऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या मृत्यूबद्दल ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. त्यांचे पार्थिव शुक्रवारी दुपारी रुग्णवाहिकेने आणण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली. पत्नी भारती यांचा शोक अनावर झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. अनिल चौधरी यांच्या पश्चात आठ वर्षाचा मुलगा, १४ व सात वर्षाच्या मुली आणि दोन बहिणी आहेत.