२५० कोटींच्या मृग बहराचे नुकसान होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:40+5:302021-05-31T04:10:40+5:30

फोटो पी ३० जरूड पान २ ची लिड प्रशांत काळबेंडे जरूड : एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे तौक्ते ...

250 crore deer will be lost! | २५० कोटींच्या मृग बहराचे नुकसान होणार!

२५० कोटींच्या मृग बहराचे नुकसान होणार!

Next

फोटो पी ३० जरूड

पान २ ची लिड

प्रशांत काळबेंडे

जरूड : एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे तौक्ते वादळामुळे कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे ताणावर टाकलेल्या मृग बहराच्या संत्रा झाडांचा ताण तुटल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मृग बहराचे साधारणत: २५० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अवकाळी पावसामुळे मशागतीची कामे अपूर्ण असल्याने पेरणीच्या कामाला व्यत्यय आला आहे, तर वरूड तालुक्यात संत्रा मृग बहाराची पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मृग बहर फुटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरूड तालुक्यातील एकूण २२ हजार हेक्टर संत्राक्षेत्रापैकी सहा हजार हेक्टर क्षेत्रात अंबिया बहर घेतला जातो. मृग बहर येण्यासाठी ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. मात्र, अवकाळी पावसाने तो ताण तुटल्याने संत्रा उत्पादकांच्या आशा धूसर झाल्या आहेत.

कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना तौक्ते वादळाने झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेत मशागतीची कामे अपूर्णच आहे, तर संत्रा मृग बहर फुटीची शक्यता धूसर झाली आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. वादळासह आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

लॉकडाऊन मुळावर

एकीकडे संत्रा उत्पादकांवर अस्मानी संकट कोसळले असताना, खरीप हंगामातील बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूरसुद्धा आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोरोनाचे धास्तीने शेतमजूरही शेतावर येण्यास तयार नाही. शेतीची कामे जरी सुरू झाली असली आर्थिक अडचणीमुळे शेतीकरिता लागणारे बी-बियाणे उधार देण्यास तयार होत नाही, तर बँक कर्ज देत नाही, अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे. पैशांअभावी शेतकरी पंगू झाला असल्याने शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक राहील, असा अंदाजसुद्धा वर्तविला जात आहे.

काय आहे मृग बहर?

लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्यासाठी झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब/नत्र) वाढीकरिता खर्च न होता अन्नद्रव्यांचा संचय होणे जरूरी असते. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच, बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. बहर धरणे म्हणजे, झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहर येतो. त्यापैकी (पावसाळ्यात) जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहरास मृग बहर आणि ऑक्‍टोबर महिन्यात (हस्त नक्षत्रात) येणाऱ्या बहरास हस्त बहर, तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे (थंडी संपतेवेळी) येणाऱ्या बहरास आंबिया बहर म्हणतात.

कोट

तौक्ते वादळामुळे झालेल्या वादळी पावसामुळे माझ्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. मृग बहर फोडण्यासाठी आमचे लाखो रुपये खर्च झाले. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे झाडाचा ताण तुटला गेल्याने मृग बहर फुटण्याची शक्यता नाही.

- प्रकाश देशमुख, संत्रा उत्पादक शेतकरी, जरूड

--------------

तालुक्यात साधारणत: २२ हजार हेक्टर शेतीत संत्राउत्पादन घेतले जाते. परंतु, तौक्ते वादळाच्या पावसामुळे सुमारे १४ हजार हेक्टर जमिनीवरील संत्र्याच्या मृग बहराचे नुकसान झाले आहे. सदर अहवाल आपण वरिष्ठ पातळीवर पाठविला आहे.

- राजीव सावळे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, वरूड

Web Title: 250 crore deer will be lost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.