४६ दिवसांत तापाचे २,५११ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:04 PM2018-09-18T22:04:08+5:302018-09-18T22:04:40+5:30
जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाले. ही शासकीय आकडेवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यावरील उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असला, तरी ही स्थिती अत्यंत भयावह दिसत आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचा कहर आहे. स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा किती गांभीर्याने उपाययोजना करीत आहेत, ही बाब या धक्कादायक आकडेवारीवरूनच स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील आरोग्यविषयक स्थिती अशीच राहिली, तर नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्हासह अन्य जवळील तालुक्यांतील आरोग्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण तापाचेच असल्याचे दिसून येत आहे. १ आॅगस्ट ते १६ सप्टेंबरदरम्यान इर्विन रुग्णालयात ४० हजार ५६७ रुग्णांच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामध्ये विविध रुग्णांचा समावेश आहे. आजारी, अपघातातील जखमी, सर्पदंश, विष प्राशन, श्वानदंश अशा आदी प्रकारच्या रुग्णांचा समावेश आहे. या कालावधीत २ हजार ५११ रुग्ण तापाचे आहेत, त्यापैकी ६७६ रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीअंती पॉझिटिव्ह आलेत. यावरून ६७६ रुग्ण टायफाईडचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांवर औषधोपचार करण्यात आल्यावर काही बरे होऊन घरी गेलेत, तर काहींवर अद्यापही उपचार सुरूच आहे.
मलेरियाचा रुग्ण आढळला
इर्विन रुग्णालयात दाखल झालेल्या १ हजार ९१५ रुग्णांच्या रक्तजल नमुने तपासणी करण्यात आली असता, त्यात एक रुग्ण मलेरियाचीही आढळून आला आहे. शहरात डांसांचा उच्छाद मांडला असता डेंग्युसह मलेरियाचेही डांस असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोटाच्या विकाराचे ७७७ रुग्ण
जिल्ह्यातील दूषित पाण्यामुळे प्रभावीत नागरिकांच्या संख्या वाढत आहे. ४६ दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयात पोटाच्या विकाराचे तब्बल ७७७ रुग्ण दाखल झाले. दूषित पाण्यामुळे पोटाच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.
जिल्ह्यात सध्या व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्या अनुषंगाने इर्विन रुग्णालयात योग्यरीत्या औषधोपचार सुरू आहे. बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक