शिष्यवृत्ती परीक्षेत २५७८ पोरं पास; ५ वीचा १५ तर आठवीचा केवळ ८ टक्के निकाल
By जितेंद्र दखने | Published: May 3, 2023 05:34 PM2023-05-03T17:34:58+5:302023-05-03T17:35:43+5:30
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी पार पडली
जितेंद्र दखने- अमरावती
अमरावती : पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यात पाचवीचा १५.४८ टक्के, तर आठवीचा ८.६० टक्के निकाल लागला आहे. पाचवीचे १ हजार ८०२, तर आठवीचे ७७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दोन्ही मिळून २ हजार ७७८ मुले या परीक्षेत पास झाली आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी पार पडली. या परीक्षेला पाचवीच्या १२ हजार १५७ जणांनी नोंदणी केली. यापैकी ११ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. आठवीच्या ९४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०२८ जणांनी परीक्षा दिली. अशा एकूण २० हजार ६६६ पैकी केवळ २ हजार ५७८ विद्यार्थीच शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
निकालात अंजनगाव तालुका अव्वल
जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात अंजनगाव सुर्जी तालुका (१४.३३ टक्के) अव्वल आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अमरावती तालुका १२.५० टक्के, तिसऱ्या क्रमांकावर धामणगाव रेल्वे ११.११, त्यानंतर मोर्शी १०.९५ टक्के, वरुड ७.७२ टक्के याप्रमाणे निकालाची टक्केवारी आहे. उर्वरित सर्व तालुके निकालाच्या टक्केवारीत मागे पडले आहेत.
तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी संख्या
तालुका पाचवी आठवी
अमरावती-२४६-२६६
अंजनगाव सुर्जी-८७-८८
भातकुली-५९-११
चांदूर रेल्वे-१३-१२
चांदूर बाजार-३०-१३
चिखलदरा-२४१-०४
दर्यापूर-३२-१८
धामणगाव -१४०-६६
धारणी-२३९-३५
मोर्शी-७६-३०
नांदगाव खंडे-१७८-०६
तिवसा-१९-०७
वरुड-१०७-५१