उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरणासाठी २६ जानेवारी 'डेडलाईन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:47 PM2018-01-24T22:47:52+5:302018-01-24T22:49:06+5:30
राजापेठ ते मर्च्युरी पॉइन्टपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या देखभालीचा अखेर मुहूर्त निघाला. रंगरंगोटीपासून या देखभालीची सुरुवात झाली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राजापेठ ते मर्च्युरी पॉइन्टपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या देखभालीचा अखेर मुहूर्त निघाला. रंगरंगोटीपासून या देखभालीची सुरुवात झाली. उड्डाणपुलाच्या दुरवस्थेचे वृत्तांकन 'लोकमत'ने लोकदरबारी मांडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली. या कामासाठी निविदा काढून तत्काळ कंत्राटदार शोधण्यात आला. या कामासाठी २६ जानेवारीची डेडलाईन पीडब्लूडीकडून मिळाल्याने हे काम युध्दस्तरावर सुरू आहे.
राजापेठ उड्डाणपूल अमरावतीची शान असताना काही वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाला उतरती कळा आली होती. या पुलाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारल्यानंतर त्यांनी निविदा काढल्या. मात्र, कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे पुन्हा उड्डाणपुलाच्या देखभालीसाठी निविदा काढण्यात आली. दरम्यानच्या काळात पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांचा शोध घेतला. राजापेठ ते मच्युरी पाईन्ट व गाडगेनगर-पंचवटी या दोन्ही उड्डाणपुलाच्या देखभालीच्या जबाबदारीसाठी कंत्राटदार मिळाला. दोन्ही उड्डाणपुलाच्या देखभालीसाठी ३६ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यानुसार सद्यस्थितीत राजापेठ ते मर्च्युरी पॉईन्टपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या देखभालीचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वप्रथम उड्डाणपुलाच्या सुरक्षा कठड्यांची रंगरंगोटीला सुरुवात करण्यात आली असून त्यानंतर झेब्रा कॉन्सिंग, दिशादर्शक फलके, पट्टे व अन्य कामी केली जाणार आहे.
पहिल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा निविदा काढली. तेव्हा कंत्राटदार मिळाला. प्रथम रंगरंगोटी सुरु केली. २६ जानेवारीपर्यंत कामे उरकण्यासाठी सांगण्यात आले.
- सदानंद शेंडगे,
कार्यकारी अभियंता. बीअॅन्डसी