२६५७ मतदान केंद्र ‘डिसेबल फ्रेंडली’- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 26, 2023 04:03 PM2023-09-26T16:03:55+5:302023-09-26T16:19:27+5:30
विविध उपक्रमांद्वारे नवमतदारांच्या नोंदणीवर भर
अमरावती : जिल्ह्यात मतदानाचा टक्का सर्वाधिक राहावा, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी शत-प्रतिशत नवमतदारांची नोंदणी व्हावी, याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या ‘हाऊस टू हाऊस’ बीएलओ जात आहे. मतदाराचे यादीत नाव आहे काय, याची खातरजमा करीत असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आगामी काळ निवडणुकांचा राहणार आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व म्हणजेच २६५७ मतदान केंद्र ‘डिसेबल फ्रेंडली’ राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला निर्देश देण्यात आल्याचेे जिल्हाधिकारी कटियार म्हणाले.
निवडणूक विणागाचे अॅपद्वारेही मतदारांना नोंदणी, चुकांची दुरुस्ती करता येते. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येऊन नवमतदारांमध्ये मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. या कॅम्पमध्ये नवमतदारांची नोंदणी करण्यात येत आहे व याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले.
सण-उत्सवादरम्यान स्पर्धा, जनजागृती
मतदान व मतदार नोंदणीसाठी विविध अभियानाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी सण-उत्सवांदरम्यान विविध स्पर्धा व उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. यामधील विजेत्यांना पुरस्कारही दिल्या जात आहे. याशिवाय शाळा महाविद्यालयातही विविध स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कटियार यांनी दिली