गारपीट नुकसानीचा २६.८४ कोटी मदतनिधी जिल्ह्यास प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:14+5:302021-02-24T04:14:14+5:30
अमरावती : जिल्ह्यात गतवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे रबीतील फळपिकांचे १५,८९८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर ...
अमरावती : जिल्ह्यात गतवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे रबीतील फळपिकांचे १५,८९८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी शासनाद्वारा २६ कोटी ८४ लाख ६१ हजारांचा मदतनिधी मंगळवारी जिल्ह्याला उपलब्ध झालेला आहे. बुधवारी बाधित तालुक्यांना हा निधी वितरित होणार आहे.
गतवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे रबी पिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत जिल्हा पथकांद्वारा सर्व्हेक्षण व पंचनामे करण्यात येऊन ३३ टक्क्यांवर नुकसानाचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्या नुकसानीचा निधी गत आठवड्यात विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला व आता हा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला व बुधवारी सर्व तालुक्यांना उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
प्रचलित निकषानुसार ३३ टक्क्यांवर बाधित क्षेत्रासाठी हा मदतनिधी राहील. बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी जमा करण्यात येणार आहे. यातून कोणत्याही प्रकारची थकबाकीची वसुली करण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत.