परतवाड्यात सापडले २७ जिवंत गावठी बॉम्ब, दोघांना अटक
By प्रदीप भाकरे | Published: August 31, 2023 02:30 PM2023-08-31T14:30:14+5:302023-08-31T14:32:16+5:30
रानडुकराच्या शिकारीसाठी गावठी बॉम्बचा वापर
परतवाडा (अमरावती) : गावठी बॉम्बचा वापर करून रानडुकराची शिकार करणाऱ्या दुचाकीवरील दोघांना २७ जिवंत गावठी आणि मृत रानडुकरासह शहरातील अंजनगाव स्टॉप येथे अटक करण्यात आली. परतवाडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी सकाळी ६ वाजता ही कारवाई केली.
पोलीस सूत्रांनुसार, चांदचौदसिंग कनीसिंग बावरी (५०) व अशोक सावळाराम शिंदे (४५, दोघेही रा. लालपूल, परतवाडा) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात भादंविचे कलम २८६, सहकलम ३ (ए), ५ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ व कलम ९ ३९ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ३, ५, २५, २७ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर यांना दोन इसम हे अंजनगाव मार्गाने लालपुलाकडे रानडुकराची शिकार करून दुचाकीवर त्याला टाकून घेऊन आल्याची व त्यांच्याकडे गावठी बॉम्ब असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून सापळा रचून कारवाई करण्यात आली. दुचाकीच्या हँडलला लटकलेल्या पिशवीत २७ गावठी बाँब होते. त्यापूर्वी काही बॉम्ब त्यांनी शिवारात पेरले होते. त्यामुळे मेलेले रानडुक्कर त्यांनी सोबत घेतले होते. परतवाडाचे ठाणेदार संदीप चव्हाण पुढील तपास करीत आहेत.