वाबळेवाडीच्या धर्तीवर जिल्ह्यातील २७ शाळांचा होणार ‘आदर्श’ कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 05:00 AM2022-03-23T05:00:00+5:302022-03-23T05:00:58+5:30
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने विश्वस्तरावर नावलौकिक मिळविले. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात आता चार आदर्श शाळा विकसित केल्या जाणार आहे. त्याकरिता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदर्श शाळांसाठी ९५० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ना. बच्चू कडू यांनी गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ आता संपुष्टात येणार आहे. राज्य शासनाने पुढील चार वर्षांत १५०० शाळा आदर्श म्हणून नावारूपास आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्हा परिषदेच्या २७ शाळा आदर्श शाळा म्हणून नावारूपास येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने विश्वस्तरावर नावलौकिक मिळविले. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात आता चार आदर्श शाळा विकसित केल्या जाणार आहे. त्याकरिता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदर्श शाळांसाठी ९५० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ना. बच्चू कडू यांनी गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे. अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २७ शाळा आदर्श म्हणून विकसित केले जाणार आहे. यात अचलपूर, अमरावती, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दयार्पूर, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगाव खंडेश्र्वर, तिवसा, वरूड आणि अमरावती महापालिका शाळांचा समावेश करण्यात आल्याचे ना. बच्चू कडू यांनी सांगितले.
या असतील आदर्श शाळेत सुविधा
- वाढता लोकसहभाग, इंटरनेट कनेक्टिव्हिटी
- १०० ते १५० पटसंख्या
- शालेय प्रांगणात अंगणवाडी
- आकर्षक शाळा इमारत, अध्ययन सुविधा
- स्मार्ट वर्ग खोल्या, बोलक्या भिंती
- मुला- मुलींकरिता पुरेशी व स्वतंत्र स्वच्छतागृहे
- पेयजल सुविधा आणि हॅंडवॉश स्टेशन
- मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह, भांडार कक्ष
- शैक्षणिक साहित्य, खेळाचे सुसज्ज मैदान, साहित्य
- सुसज्ज ग्रंथालय, वाचनालय, संगणक कक्ष,
- व्हर्च्यअल क्लास रूम, आयएसओ मानांकन
- शाळेत विद्युतीकरण सुविधा, संरक्षक भिंत
- शाळेत अग्निरोधक यंत्रणा, आकस्मिक प्रवेशद्धार
- शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था
- उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत, देशाबाहेर प्रशिक्षण
- विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आदर्श शाळा हा नवा उपक्रम सुरू होत आहे. यात जिल्ह्यातील २७ शाळांना स्थान मिळाले. यातून देशाभिमान, गौरवशाली विद्यार्थी घडविले जातील. आदर्श शाळेसाठी वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. - बच्चू कडू, शालेय शिक्षण राज्यमंत्री