राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे २७० पाकिस्तानी हिंदू नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:17 PM2018-03-24T15:17:36+5:302018-03-24T15:17:45+5:30
पाकिस्तानातील तब्बल २७० हिंदू शुक्रवारी गुरुकुंजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे नतमस्तक झाले. ते एक महिन्याच्या व्हिसावर भारत भ्रमण करीत आहेत.
अमित कांडलकर/
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाकिस्तानातील तब्बल २७० हिंदू शुक्रवारी गुरुकुंजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे नतमस्तक झाले. ते एक महिन्याच्या व्हिसावर भारत भ्रमण करीत आहेत.
पाकिस्तानी नागरिक असलेले हिंदू दुपारी ४ वाजता गुरुकुंज आश्रमात लाल रंग असलेल्या ट्रॅव्हल्सने आले. सर्वप्रथम त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ गाठले. खास पठाणी पहेरावातील हा जत्था पाहून महामार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या अनेकांच्या भुवया काही क्षण उंचावल्या. पण, सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारे वंदनीय तुकडोजी महाराज आणि अनेक धर्म-संप्रदायाचे नियमित येणारे गुरुदेवभक्त यामुळे त्यांचा हा समज काही क्षणात दूर झाला. यावेळी त्यांच्यासोबत रायपूर येथील शदानी मंडळाचे महंत युधिष्ठीर लाल, अमरावतीचे माजी उपमहापौर चेतन पवार, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी, अध्यात्म विभागप्रमुख राजाराम बोथे, दिलीप कोहळे, उद्धवराव वानखडे, धीरज इंगळे, अरविंद राठोड व शेकडो सिंधी बांधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रार्थना मंदिर, ध्यानयोग मंदिर, अस्थिकुंड, मध्यवर्ती सभागृह आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांना वंदनीय तुकडोजी महाराजांचे कार्य आपल्या खास शैलीतून दिलीप कोहळे यांनी समजावून सांगितले. गुरुकुंज भेटीतून प्रचंड आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी शेरेबुकात लिहिली. यावेळी आपल्या शेजारी देशातील नागरिकांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
भारत माता की जय!
महासमाधीपुढे स्थळी नतमस्तक झाल्यावर पाकिस्तानी हिंदूंच्या तोंडून आपसूकच ‘भारत माता की जय’चा उद्घोषणा झाली, हे विशेष. आम्ही पाकिस्तानात राहत असलो तरी रीतिरिवाज कायम आहेत. नुकताच आम्ही होळीचा सण साजरा केला. सोबतच दिवाळीसारखा सणही आम्ही साजरा करतो, असे त्यांनी बोलताना सांगितले.