२७३ गावात पाणीटंचाई, ३७५ उपाययोजनांची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:08 PM2018-10-29T23:08:21+5:302018-10-29T23:08:51+5:30
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गावागावांतील स्त्रोताची पातळी कमी होत आहे. भुजलाची पातळी देखील खालावल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यत किमान २७३ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ३७५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गावागावांतील स्त्रोताची पातळी कमी होत आहे. भुजलाची पातळी देखील खालावल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यत किमान २७३ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ३७५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर किमान तीन कोटी ९८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. संयुक्त स्वाक्षरी अहवालाद्वारे जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात ही बाब स्पष्ट केली आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने किमान ४५५ गावांंमध्ये पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. यापैकी २७३ गावात डिसेंबरपर्यत टंचाईची झळ बसणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व भूजल सर्वेक्षण विभागाचे भूवैज्ञानिक यांनी संयुक्त कृती आराखडा सोमवारी जाहीर केला. त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणीटंचाईची झळ पोहोचणाºया २७३ गावांसाठी ३.९८ कोटींच्या खर्चाचा कृती आराखड्याद्वारे ३७५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. राज्यातील बहुतेक गावांमध्ये थोड्याफार फरकात हिच स्थिती कायम असल्याने शासनाने या संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी तत्काळ नियोजन करण्याचे आदेश दिल्यामुळे यंदा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या कालावधीत अमरावती तालुक्यात ९४, नांदगाव खंडेश्वर ५, भातकुली १, तिवसा ११, मोर्शी २२, वरूड २०, चांदूर रेल्वे २४, धामणगाव रेल्वे ६, अचलपूर १५ व चांदूर बाजार तालुक्यात १ गावात पाणीटंचाई राहणार आहे. संबंधित विभागाचा समन्वयाचा अभाव पाहता नियोजनाचाच दुष्काळ असल्याचे दिसून येते.
अशा आहेत उपाययोजना व खर्च
डिसेंबरअखेपर्यंत ४३ गावांमध्ये ६४ नवीन विंधन विहीर व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर ६७.५८ कोटींचा खर्च होणार आहे. १३ गावांमध्ये १४ नळयोजनांची विशेष दुरूस्तीवर ५३ लाख, १० गावात तात्पुरत्या नळयोजनांवर ६९ लाख, ११ गावांतील २० विंधन विहिरींची दुरूस्तीवर १२.३० लाख, १३ गावांत १७ टँकरसाठी ३५.४३ लाख, ३२ गावांतील ५३ विहिरी खोल करण्यावर ४०.९५ लाख तसेच १६८ गावात १९४ खासगी विहिरींचे अधिग्रहणासाठी १.०८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
१९४ खासगी विहिरींचे अधिग्रहण
डिसेंबर अखेरपर्यंत १६४ गावात १९४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १७, नांदगाव तालुक्यात ५, भातकुली १, तिवसा १०, मोर्शी ३१, वरूड २५, चांदूर रेल्वे ८२, धामणगाव ७ व अचलपूर तालुक्यात १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. तिवसा तालुक्यात ६, मोर्शी ४, वरूड ४ व चांदूर रेल्वे तालुक्यात चार गावांमध्ये टँकरणे पाणी पुरवठा करणे प्रस्तावित आहे. दिवाळीनंतर काही गावांमध्ये टँकर सुरू होण्याची शक्यता आहे.