२८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर 'दादा, मामा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:07 AM2024-10-04T11:07:19+5:302024-10-04T11:08:01+5:30

फॅन्सी नंबर प्लेट : वाहतूक शाखेकडून कार्यवाही मोहिमेला वेग

2800 drivers fined, still 'Dada, Mama' on the number plate! | २८०० वाहनचालकांना दंड, तरीही नंबरप्लेटवर 'दादा, मामा'!

2800 drivers fined, still 'Dada, Mama' on the number plate!

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत सुमारे २८०२ वाहनधारकांना ई-चालानने दंड ठोठावला. तरीही 'दादा', 'मामा', 'काका', 'भाऊ' अशा फॅन्सी नंबर प्लेटला लगाम बसलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाहतूक पोलिस फॅन्सी नंबर प्लेटबाबत मोहीम हाती घेणार आहेत.


शहरातील काही वाहनधारक, विशेषतः राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या मोटारसायकल, कारवर 'दादा', 'मामा' नंबरप्लेट वापरतात. शहरातील साखळी चोरीच्या घटनांमध्येही बरेचदा दुचाकीवरील नंबर चटकन ओळखू येऊ नये म्हणून कलाकुसर करून नंबर टाकण्यात येत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने यंदा २८०० च्या आसपास वाहनधारकांवर कारवाई करत ५०० पेक्षा अधिक वाहनांच्या फॅन्सी नंबर प्लेट काढून टाकल्या. 'नो- पार्किंग'मधून उचलून आणलेल्या गाड्यांमध्येदेखील अशी गाडी आढळल्यास त्यावरही कारवाई करण्यात येत आहे. 


शहरातील अनेक दुचाकींच्या मागील नंबर प्लेटवर 'बॉस', 'भाई', 'दादा', 'काका', 'मामा' अशी अक्षरे दिसतात. ही काही नातेवाइकांची नावे नाहीत, तर या आहेत फॅन्सी नंबर प्लेट. फटफट आवाज करत असलेली बुलेट आणि तिच्यावर असलेली अशी नंबरप्लेट हे चित्र तुम्ही अनेकदा पाहिले असेल. 


सध्या फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड आले आहे. नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारचे सांकेतिक चिन्ह किंवा तत्सम गोष्टी लावणे नियमांच्या विरोधात आहे. त्याला दंडही ठोठावला जातो. मात्र, त्यानंतरही ते फॅड कमी झालेले नाही. 


अशी झाली कारवाई 
महिना                     केसेस 

जानेवारी                     २६४ 
फेब्रुवारी                      ४२६ 
मार्च                           ३९६ 
एप्रिल                         २६४
मे                               ३७० 
जून                            ३५५ 
जुलै                            ४११ 
ऑगस्ट                        ३१६ 


काय म्हणतो नियम ? 
वाहन कायद्यानुसार वाहकाला त्याच्या गाडीचा क्रमांक पुढील आणि मागील बाजूस लावला पाहिजे. सर्व नंबर प्लेट्स पटकन लक्षात येतील अशा अक्षरात असणे आवश्यक आहे. कार किवा बाइकवरील नंबर प्लेटच्या संख्यांचा आकार कमीत कमी दोन इंच असणे आवश्यक आहे. कार किंवा बाइकवर लावलेल्या नंबर प्लेटवरील क्रमांक हे वाचण्याजोगे असावेत.

"जानेवारी ते ऑगस्टदरम्यान विनाक्रमांकाच्या व फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या २८०२ वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला. ऑगस्टअखेरपर्यंत ६२ हजार वाहनधारकांनी वाहतूक नियम मोडले. फॅन्सी नंबर प्लेट व विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाईची मोहीम अधिक वेगाने करण्यात येईल." 
- ज्योती विल्लेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक


 

Web Title: 2800 drivers fined, still 'Dada, Mama' on the number plate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.