२९ अधिकारी, कर्मचारी आढळले गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:52+5:302021-08-12T04:16:52+5:30
आमदारांचा आकस्मिक दौरा, वरूड तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार वरूड : आमदारांच्या आकस्मिक भेटीत वरूड तहसील कार्यालयातील तब्बल २९ कर्मचारी ...
आमदारांचा आकस्मिक दौरा, वरूड तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार
वरूड : आमदारांच्या आकस्मिक भेटीत वरूड तहसील कार्यालयातील तब्बल २९ कर्मचारी गैरहजर आढळून आले. यामुळे संताप व्यक्त करीत आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले.
स्थानिक तहसील कार्यालयात श्रावणबाळ, संजय गांधी विभागातील संपूर्ण कर्मचारी २९ जुलैपासून सुटीवर असल्यामुळे वरूड तालुक्यातील शेकडो लाभार्थींना अडचणी येत असल्याने अनेक तक्रारी आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे प्राप्त झाल्या. त्याची गंभीर दखल घेऊन ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वरूड तहसील कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी २९ कर्मचारी, अधिकारी गैरहजर आढळून आले. जिल्हाधिकारी या लेटलतीफ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----------
नायब तहसीलदाराचाही समावेश
कामकाजाचा आठवडा संपवून शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सलग रजा उपभोगल्यानंतरही वरूड येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी ९ वाजून ४५ मिनिटांनी कार्यालय गाठले नव्हते. तहसील कार्यालयामध्ये ३५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी तब्बल २९ कर्मचारी सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गैरहजर आढळले. त्यामध्ये नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहायक, शिपाई, कॉम्पुटर ऑपरेटर यांचा समावेश आहे. उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिले.