अमरावती राज्यात दुसरी, शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत मिळवले उत्तुंग यश
By प्रदीप भाकरे | Published: April 20, 2023 05:25 PM2023-04-20T17:25:34+5:302023-04-20T17:31:28+5:30
पटकावले १० कोटींचे बक्षिस : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त सन्मानित
अमरावती : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ चा निकाल नगरविकास दिनी गुरूवारी घोषित करण्यात आला. ‘ड’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये पनवेल, अमरावती व अहमदनगर महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये अमरावती महापालिकेने १० कोटी रुपयांचे द्वितिय बक्षिस पटकावले.
स्पर्धेसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची सहा गटात विभागणी करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी रुपये या प्रमाणे पारितोषिके देण्यात आले. नगरविकास दिनानिमित्त गुरूवारी मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा निकाल जाहीर करण्यात आला.
अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो दहा कोटींचा पुरस्कार स्विकारला. राज्यातील शहरे स्वच्छ व सुंदर दिसावी या संकल्पनेतून शासनाच्या वतीने सप्टेंबर २०२२ मध्ये एक शासन निर्णय पारित केला होता. त्याअंतर्गत राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ राबविण्यात आली होती. अमरावती महानगरपालिकेनेही या स्पर्धेत सहभाग घेत महापालिका हद्दीत कायापालट अभियान राबविले. पालिकेने राबविलेल्या उपक्रमांमुळे पालिका प्रशासनाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. यावेळी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी देखील उपस्थित होत्या.
'असे' बदलले रूपडे
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीत पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. महापालिकेने शहरातील रस्ते सौंदर्यीकरण केले. शहरातील विविध शाळा, सरकारी कार्यालये, निवास स्थाने, उड्डाणपूल, खासगी मिळकतींच्या वाडे भिंतींवर विद्यार्थ्यांमार्फत सुंदर चित्रे रंगवून या भिंतीचे रुपडे नेत्रसुखद केले. या कामांची पोचपावती म्हणून शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ मध्ये शासनाच्या समितीने ‘ड’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये शहराला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार. या सर्वांच्या एकत्रित कामामुळे, टीम वर्कमुळे आपण राज्यात दुसरा क्रमांक पटकावू शकलो. शहर अभियंता व त्यांची इंजिनियर टीम, सहाय्यक आयुक्तांचे सांघिक प्रयत्नांमुळे अंबानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, अमरावती