५०० एकरांतील सोयाबीन जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:32 AM2019-07-27T01:32:55+5:302019-07-27T01:33:19+5:30
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.
हिवरा मुरादे या गावातील शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच जवळपास ५०० एकरांत सोयाबीनची पेरणी केली. पीकही जमीनीबाहेर आले. मात्र, २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पीक जळून नष्ट झाले. आता पाऊस आला तरीही पिकाला काहीच फायदा नाही. हिवरा मुरादे, वडाळा, फत्तेपूर, पिंपळगाव निपाणी, बोरगाव, पुसनेर, टाकळी कानडा, टाकळी गिलबा आणि पिंपळगाव या गावांतही पिकांची स्थिती भयावह आहे. त्याअनुषंगाने हिवरा मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भेटून सोयाबीन पिकांची वास्तविकत: विशद केली. परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आर्थिक मदत देण्याबाबत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.
यावेळी सरपंच सुषमा मुरादे, उपसरपंच रमाकांत मुरादे, रवींद्र मुरादे, प्रमोद मुरादे, अजय मुरादे, अमोल जाधव, साहेबराव मोडक, गणेश डवले, राहुल डांगे, महादेव गायकवाड, प्रशांत मुरादे, तुळशिदास पाडर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.
पशुधनाचेही हाल
पाऊस नसल्याने एकीकडे सोयाबीन पिके जळून नष्ट झाली आहेत. दुसरीकडे पशुधनाला चारा व पाणी नसल्याने पशुधन कसे पाळावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधनाला चारा व पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हिवरा-मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यासोबतच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याबाबत लक्ष वेधले. यावर योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शेतकºयांना दिले.
हिवरा- मुरादे या गावासह परिसरातील शिवारात पाऊसच नसल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक जळून नष्ट झाले आहे. आता पाऊस आला तरी काही उपयोग नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई देऊन तातडीची आर्थिक मदत केल्यास दुसºया पिकासाठी तडजोड तरी करता येईल.
- रवींद्र मुरादे, शेतकरी, हिवरा मुरादे