शहरातील ८२ तडीपार, तिघांविरुद्ध एमपीडीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:59+5:30
निवडणुकीदरम्यान अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे आठ पथके तयार करण्यात आली आहेत. अवैध दारूची विक्री, शस्त्र बाळगणे, पैशांची देवाणघेवाण आदी प्रकारांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. यासाठी पोलिसांची आठ भरारी पथके फिरस्तीवर राहतील. या पथकात आठ अधिकारी व प्रत्येकी चार कर्मचारी राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, या उद्देशाने शहर पोलिसांचा अॅक्शन प्लॅन तयार झाला आहे. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून ८२ आरोपींना तडीपार करण्यात आले असून, ३ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए (झोपडपट्टी दादा) कारवाई करण्यात आली. ७०० हून अधिक आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या आदेशान्वये ८२ आरोपींना तडीपार केले असून, २७ आरोपी तडीपारीच्या रांगेत आहेत. याशिवाय तीन गुन्हेगारांवर एमपीडीए करण्यास मान्यता देण्यात आली असून, आणखी तीन गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएची कारवाई केली जाणार आहे. निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात गुन्हेविषयक घटना घडण्याची शक्यता असते. त्यावर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. शहर आयुक्तालयातील ८० टक्के पोलीस निवडणुकीच्या बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनात तब्बल १८०० पोलीस बंदोबस्तात राहतील. त्यांच्या मदतीला होमगार्ड, सीआरपीएफच्या तीन तुकड्या तसेच अतिरिक्त पोलिस दलाची मागणी डीजी कार्यालयास करण्यात आल्याची माहिती बाविस्कर यांनी दिली. सोमवारी झालेल्या बैठकीला पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, नीलिमा आरज उपस्थित होत्या.
सीपींनी घेतली बैठक
निवडणुकीदरम्यान अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे आठ पथके तयार करण्यात आली आहेत. अवैध दारूची विक्री, शस्त्र बाळगणे, पैशांची देवाणघेवाण आदी प्रकारांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. यासाठी पोलिसांची आठ भरारी पथके फिरस्तीवर राहतील. या पथकात आठ अधिकारी व प्रत्येकी चार कर्मचारी राहतील. मतदान प्रक्रियेचे छायाचित्रीकरण केले जाणार आहे.
५८ मतदान केंद्रांवर १७७ संवेदनशील बूथ
आगामी विधासभा निवडणुकीसाठी शहरात २६ मतदान केंद्रांवर ७६० बूथ आहेत. यातील ५८ केंद्रांचे १७७ बूथ हे संवेदनशील असून, तेथे पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. मतदान केंद्रावर बंदूकधारी पोलीस तैनात केले जाईल.
शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरु
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील ३९५ नागरिकांकडे बंदुकीचा परवाना आहे. त्यांना नूतनीकरण करणे आवश्यक असते. निवडणुकीपूर्वी त्याच्याजवळील अग्निशस्त्र जमा करण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून संबंधित नागरिकांना देण्यात आल्या असून, त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे.