३ हजार २८९ अंगणवाडी सेविकांना मिळाले स्मार्टफोन
By जितेंद्र दखने | Published: March 11, 2024 07:46 PM2024-03-11T19:46:15+5:302024-03-11T19:46:48+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप : ऑनलाइन कामकाज होणार सुकर
अमरावती : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या हातात पुन्हा नव्याने स्मार्ट फोन येणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनानंतर शासनाच्या महिला व बालविकास विभागाने सर्वच अंगणवाडी सेविकांना नव्याने चांगल्या दर्जाचे स्मार्ट फोन खरेदी केले आहेत. जिल्ह्यासाठी ३ हजार २९८ मोबाइल शासनाने उपलब्ध करून दिले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार,आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.
राज्यातील अंगणवाड्यांचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. सेविकांकडून अनेक शासकीय कामे केली जातात. अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक सेविकेला मोबाइल देण्यात आले होते. महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पोषण ट्रॅकर या ॲपद्वारे ऑनलाइन भरावी लागते. या ॲपमध्ये बालकाची उंची, वजन, पोषण आहार, गृहभेटी, उपस्थिती आदी प्रकारची माहिती भरण्यात येत होती. परंतु, अनेक वर्षे झालेला वापर व व्यवस्थित मोबाइल चालत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करत जुने फोन शासनाला परत केले होते.
तसेच नव्या स्मार्टफोनची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३ हजार २९८ अंगणवाडी सेविका आणि १२५ पर्यवेक्षक यांना मोबाइल उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी सौरभ कटियार जिल्हाधिकारी हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की महिला बाल विकास विभाग हा एक महत्त्वपूर्ण विभाग असून या विभागांची सर्व माहिती ऑनलाइन असणे ही एक उत्तम बाब आहे. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ संजिता मोहपात्रा, या मार्गदर्शन केले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके विलास दुर्गे, वीरेंद्र गलपट, प्रतिभा माहुलकर, चित्रा वानखेडे, योगेश वानखेडे, शिवानंद वासनकर, विजय काळे आणि अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्ट मिळाल्यानंतर त्यांना दैनंदिन अहवालाबरोबर तांत्रिक काम करणे सोपे होणार आहे. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर आरोग्य विषय माहिती क्षणाक्षणाला अपडेट होणार आहे. पुन्हा स्मार्टफोन मिळाल्याने सेविका पुन्हा हायटेक होणार आहेत.
- संजिता मोहपात्रा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अमरावती