पूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:38 AM2019-07-28T01:38:18+5:302019-07-28T01:38:59+5:30
यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे.
पावसावर तालुक्यांची मदार। आतापर्यंत बरसला केवळ २३५ मिलीमीटर
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित होण्याचे चित्र आहे.
तालुक्यातील चांदूर बाजारसह जिल्ह्यातील १०५ गावांची तहान भागवणाऱ्या पूर्णा धरणात यंदा कमी पावसामुळे मोठी तूट झाली आहे. दोन महिने लोटूनही पावसाने मुबलक प्रमाणात हजेरी न लावल्याने धरणात केवळ २४ टक्के जलसाठा उपलब्ध होऊ शकला. पूर्णा धरणातील जलसाठा पूर्णत: मध्य प्रदेशातील भैसदेही व सावलमेंढा या भागात झालेल्या पावसावर अवलंबून असतो. मात्र, मध्य प्रदेशात गेल्या पंधरवड्यात अल्प प्रमाणात पाऊस कोसळल्याने धरणाच्या पातळीत विशेष वाढ झाली नाही. धरणात आजरोजी ४४३.६५ मीटर पाण्याची पातळी आहे. मात्र, जुलैअखेर ही पाण्याची पातळी ४४७.५२ म्हणजे ५१.६३ टक्के पाहिजे. तथापि, यावर्षी जून महिन्यापासून भैसदेही येथे १४९ मिमी, तर सावलमेंढा येथे केवळ ७२ मिमी पाऊस झाला आहे.
दरवर्षी मध्य प्रदेशातील भैसदेही व सावलमेंढा या भागात उशिरा पाऊस हजेरी लावत असल्याने धरणात आॅगस्ट महिन्यात पाण्याची पातळी वाढते. मात्र, यंदा ही शक्यता कठीण आहे. धरणावरील कर्मचारी दररोज सावलमेंढा व भैसदेही येथील शेतकऱ्यांकडून पावसाची आकडेवारी घेतात. मात्र, महाराष्ट्रातील बेलकुंड परिसरात दूरध्वनीची सुविधा उपलब्ध नसल्याने त्या भागातील पावसाची आकडेवारी मिळत नाही आणि त्यामुळे पाणीपातळीत अचानक वाढ होऊ लागते. पाच वर्षांपूर्वी धरणाचा साठा अचानक वाढल्याने ऐनवेळी पाणी सोडावे लागले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता.
सुरक्षा बेदखल
मराठवाडा भागातील एक धरणातील पाण्यात विष काळविल्याची घटना घडली होती. त्यामुळे तेथील ३० गावांचा पाणीपुरवठा बंद करावा लागला होता. त्यामुळे पूर्ण धरणाची सुरक्षासुद्धा अतिमहत्त्वाची आहे. धरणाच्या सुरक्षिततेकरिता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र ते बंद आहेत. ड्युटीवर कार्यरत कर्मचारी पूर्णत: माहिती नसणे हेदेखील धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.