सराईत चोराकडून ३० सायकली हस्तगत, १४ गुन्हे उघड
By प्रदीप भाकरे | Published: March 20, 2023 04:21 PM2023-03-20T16:21:48+5:302023-03-20T16:22:39+5:30
शहरात दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू असताना काही भुरट्यांनी सायकल चोरीकडे लक्ष वळविले होते.
अमरावती : एका सराईत चोराकडून तब्बल ३० सायकली हस्तगत करण्यात गुन्हे शाखेने यश मिळविले. अब्दुल रहमान अब्दुल नजीर (३१, रा. यास्मिननगर, अमरावती) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे सायकल चोरीचे एकूण १४ गुन्हे उघड झाले आहेत.
शहरात दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू असताना काही भुरट्यांनी सायकल चोरीकडे लक्ष वळविले होते. त्यासाठी शिकवणी वर्ग, हव्याप्रमंडळातील आतील परिसर चोरांकडून टार्गेट करण्यात आला. त्यामुळे अशा सायकल चोरांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेने ट्रॅप रचला. १८ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास आरोपी अ. रहेमान अ. नजीरला अटक करण्यात आली.
पोलीस खाक्या दाखवताच त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या व अल्पकिमतीत विकलेल्या ३० चोरीच्या सायकली पोलिसांना दाखविल्या. त्या सर्व ३० सायकली त्याने गेल्या तीन महिन्यात शहरातील गाडगेनगर व अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे निरिक्षक अर्जुन ठोसरे, सहायक पोलीस निरिक्षक पंकज इंगळे, सायबरचे सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र सहारे, अजय गाडेकर, दिनेश नांदे, इम्रान शेख, निखिल माहुरे, राजीक रायलीवाले, निखिल गेडाम आदींनी केली.