परतवाडा आगारातून ३० लाल परी रस्त्यावर धावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:15+5:302021-06-09T04:16:15+5:30
मेळघाटसह लांब पल्ल्याच्या गाड्या, ग्रामीण सध्या नाही परतवाडा : दीड महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतर वाहतूक आता हळूहळू सुरू व्हायला सुरुवात ...
मेळघाटसह लांब पल्ल्याच्या गाड्या, ग्रामीण सध्या नाही
परतवाडा : दीड महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतर वाहतूक आता हळूहळू सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात जिल्ह्यात सर्वांत मोठ्या असलेल्या परतवाडा आगारातून सोमवारी पहिल्या दिवशी तीस बसगाड्या रस्त्यांवर धावल्या. त्यात मेळघाटसह औरंगाबाद, नागपूर या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे.
कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे परिवहन महामंडळाचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला. दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून बसगाड्या आगारात उभ्या होत्या. सोमवारी लॉकडाऊनमध्ये अधिक सूट मिळाल्याने ७० पैकी एकूण ३० बसगाड्या धारणी २, चिखलदरा १ या मेळघाटातील तालुका मुख्यालय यासह अमरावती, औरंगाबाद, नागपूर, अकोला, वणी, उमरखेड या मार्गांवर सुरू केल्या आहेत.
बॉक्स
३० बसगाड्यांच्या दीडशेवर फेऱ्या
जिल्ह्यात ग्रामीण भागातून सर्वांत मोठे परतवाडा आगार असल्यामुळे लॉकडाऊननंतर पहिल्या टप्प्यात ३० बसगाड्या विविध मार्गांवर सोडण्यात आल्या. त्या बसगाड्यांच्या जाणे-येणे अशा जवळपास दीडशे फेऱ्या होणार असून, प्रवाशांची संख्या पाहता उर्वरित बसगाड्या सुद्धा आगारातर्फे सुरू केल्या जाणार आहेत.
कोट
पहिल्या टप्प्यात सोमवारपासून ३० बसगाड्या विविध मार्गांवर सुरू केल्या आहेत. प्रवाशांची संख्या पाहता, त्या अजून वाढविण्यात येतील.
- नीलेश मोकलकर
सहायक वाहतूक अधीक्षक
परतवाडा आगार