राज्यात ३० हजार कोटींचे रस्ते पहिल्यांदाच; सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 09:50 AM2017-12-04T09:50:24+5:302017-12-04T09:50:49+5:30
सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
येथील मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात रविवारी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची त्यांनी बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांचा १० हजार किमींचा होत असलेल्या रस्त्याचा आढावा व हायब्रीड तत्त्वावरील रस्त्यांचाही त्यांनी माहिती घेतली. 'राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये मी आढावा घेत आहे. जेई टुु ईई यांच्या समस्या व त्यांना काम करताना येत असलेली अडचण मी जाणून घेत आहे', असे ना.पाटील म्हणाले. रस्त्यांची ईफिसिएन्सी व लॉयल्टी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात यापूर्वी ५ हजार किमीचे नॅशनल हायवे होते. गेल्या तीन वर्षांत दिल्लीत पाठपुरवा करून ते २२ हजार किमीचे नॅशनल हायवे मंजूर करवून घेतले. २२ हजार किमीच्या नॅशनल हायवेला १ लाख ६ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २० हजार कोटी आतापर्यंत प्राप्त झाले असून ते पैसे रस्त्यांच्या भूसंपादनासाठी उपयोगात येणार आहेत.
१० हजार किमीचे थ्री लाईन व नॅशनल हायवेची फोरलाई होती. महाराष्ट्रातील साडेसहा हजार किमीचे रस्ते नव्याने करण्यासाठी केंद्र शासनाने घेतले ते सहा पदरीकरण करणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची लांब ही आता ९६ हजार किमी झाली आहे.
आढावा बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंग, आ. अनिल बोंडे, मुख्य अभियंता चंदशेखर तुंगे, अधीक्षक अभियंता विवेक साळवे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
मोबाईल फिल्ड लॅबचे उद्घाटन
यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोबाईल फिल्ड लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल फिल्ड लॅब कुठल्याही कामांवर जाऊन कामांचे गुणनियंत्रण करणार आहे.
पॉझिटिव्ह काम करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन
सर्व अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह काम करा, खड्यांचे कामेही पॉझिटिव्ह होतील, असा कानमंत्रही ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. आपण जर चांगले काम केले तर त्यांचे समाधान व आनंद वेगळा मिळतो. अमरावतीच्या बाजारात आनंद विकत मिळतो काय, असा प्रश्न ना. पाटील यांनी करताच बैठकीत हशा पिकला.