चार दिवसांत ३० टक्क्यांची कसरत
By Admin | Published: March 27, 2016 12:11 AM2016-03-27T00:11:40+5:302016-03-27T00:11:40+5:30
आर्थिक वर्ष संपायला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने पालिका यंत्रणेची झोप उडाली आहे.
मालमत्ता कर वसुली : सुट्यांमुळे कामात अडथळा
अमरावती : आर्थिक वर्ष संपायला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने पालिका यंत्रणेची झोप उडाली आहे. २८ पासून ३१ मार्च या कालावधीत यंत्रणेला १२३ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान आहे.
१ एप्रिल २०१६ पासून नवे आर्थिक वर्ष लागणार आहे. तत्पूर्वी मार्च एंडिंगला आर्थिक ताळेबंदाची जुळवणी यंत्रणेला करावी लागणार आहे. एलबीटी किंवा जकात अशी कुठलीही करप्रणाली नसल्याने पालिकेचा आर्थिक भार नागरिकांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. मालमत्ता कर हाच पालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. आगामी अर्थसंकल्पातही मालमत्ता करातून सुमारे ३५ कोटी रुपये येण्याची अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. कराशिवाय पालिकेला कुठलाही मोठा उत्पन्न स्त्रोत नसल्याने पालिकेवर आर्थिक अरिष्ठ ओढविले आहे. पाचही झोनकडून मालमत्ता कराची वार्षिक मागणी ४२ कोटी ८५ लाख ६७ हजार रुपये असताना प्रत्यक्षात २२ मार्चपर्यंत २९ कोटी १९ लाख ५३ हजार ६५८ रुपये वसुली झाली आहे. अद्यापही १३ कोटी ६६ लाख रुपयांचा मालमत्ताकर नगरिकांकडे थकीत आहे. मार्च महिन्यांतील शेवटचे चार दिवस शिल्लक असल्याने पालिका यंत्रणा सोमवार ते गुरुवारपर्यंत कर वसुलीसाठी जंगजंग पछाडणार आहे. या चार दिवसांत सुमारे ५ कोटी रुपये वसुली होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
जप्तीच्या कारवाईचा धडाका
मालमत्ता कराची मागणी जरी ४२ कोटी ८५ लाखांच्या घरात असली तरी पालिकेला ३५ कोटींची अपेक्षा आहे. आतापर्यंत २९ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. त्यामुळे उर्वरित ४ दिवसांत थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईसोबत सीलची कारवाई केली जाणार आहे.
पश्चिम झोन माघारले
अन्य चार झोन प्रभागाच्या तुलनेत पश्चिम झोन प्रभाग क्र. ४ कमालीचा माघारला आहे. ३ कोटी ७१ लाख रुपयांचा मालमत्ता कर अपेक्षित असताना २२ मार्चपर्यंत केवळ ५१.८९ टक्केच वसुली करण्यात आली आहे. सर्वाधिक ७३.११ टक्के वसुली प्रभाग क्र. ३ पूर्व झोनने केली आहे.