मेळघाटात सहा महिन्यांत ३०० चिमुकल्यांचा कुपोषणाने मृत्यू
By admin | Published: November 29, 2014 12:21 AM2014-11-29T00:21:09+5:302014-11-29T00:21:09+5:30
सहा महिन्यांत मेळघाटात ३०० आदिवासी चिमुकल्यांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. ३ हजार बालके मरणासन्न अवस्थेत आहेत.
राजेश मालवीय धारणी
सहा महिन्यांत मेळघाटात ३०० आदिवासी चिमुकल्यांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. ३ हजार बालके मरणासन्न अवस्थेत आहेत. १४ हजार बालके गंभीर कुपोषणाच्या विळख्यात अडकले आहेत.
शासकीय आकडेवारीनुसार मेळघाटात एकूण ५१ हजार आदिवासी बालके कुपोषण श्रेणीत आहेत. त्यात ३४ हजार साधारण श्रेणीत, १४ हजार मध्यम श्रेणी आणि ३ हजार तीव्र कुपोषित श्रेणीत आहेत. कुपोषण नियंत्रणासाठी प्रशासनाकडून ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य वैद्यकीय यंत्रणा, औषध साठा, २२ भरारी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पथके, ग्राम बालविकास केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, बाल उपचार केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी, सामाजिक संस्था, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आदीच्या माध्यमातून आवश्यक ती सोईसुविधा पुरविल्या जात आहे व कुपोषणावर दर महिन्यात २ कोटी रूपयांपेक्षाही अधिक शासन खर्च करीत आहे.
एकट्या जि.प.च्या बालविकास प्रकल्प कार्यालयातून कुपोषितांच्या अतिरिक्त आहार व पूरक पोषण आहारावर दर महिन्यात ५० लाख रूपये खर्च होत असल्याची नोंद आहे. तरीही कुपोषण नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.