शहरातून ११ महिन्यांत ३०१ दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:10+5:302020-12-29T04:12:10+5:30
अमरावती : २०२० च्या ११ महिन्यांत ३०१ दुचाकी शहर हद्दीतून चोरीला गेल्या. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या किंचित घटली आहे. ...
अमरावती : २०२० च्या ११ महिन्यांत ३०१ दुचाकी शहर हद्दीतून चोरीला गेल्या. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या किंचित घटली आहे. त्यापैकी फक्त ४७ दुचाकी पोलिसांनी रिकव्हर केल्या आहेत. ही आकडेवारी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यानची आहे.
गतवर्षी २०१९ मध्ये ३३७ दुचाकी लंपास करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६७ दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले. ही आकडेवारी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ दरम्यान ११ महिन्यांची आहे.
शहरातून मुख्य चौकातून, हॉस्पिटलजवळून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरल्यानंतर फारच कमी पैशांत चोरटे ती इतरांना विकून मोकळे होत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अलीकडे काही दुचाकीचोर गजाआड केले आहेत.
बॉक्स:
उसने पैसे देण्याच्या नावावर दुचाकींची विक्री
गरीब गरजू लोकांना चोरटे हेरतात. मला पैशांचे खूप काम आहे. तात्पुरते पैसे द्या. जोपर्यंत पैसे परत करीत नाही, तोपर्यंत ही दुचाकी तुमच्याकडेच ठेवा. कागतपत्रे घरी आहेत, आणून देतो, अशी बतावणी करून हजार ते पाच हजारांच्या बदल्यात चोरलेल्या दुचाकी नागरिकांच्या स्वाधीन केल्या जातात. चोरटा पैसे मिळाल्यानंतर पुन्हा कधी येत नाही. ही बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाली. म्हणून तपास करण्यास किंवा चोरलेले दुचाकी रिकव्हर करण्यात विलंब लागतो.
बॉक्स:
काही टोळ्या पकडल्या
यंदा ३०१ दुचाक्या चोरीला गेल्या. त्यापैकी ४७ दुचाकी पोलिसांनी परत मिळविल्या. गुन्हे शाखेने काही आठवड्यांपूर्वी चोरट्यांच्या पाच टोळ्या जेरबंद केल्या. त्यांच्याकडून इतर जिल्ह्यातील चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या. दुचाकीचोरांचे नेटवर्क संपूर्ण विदर्भात फोफावले आहे.
वर्षभरात चोरीला गेलेल्या दुचाकी - ३०१
वर्षभरात दुचाकींचा शोध - ४७
बॉक्स:
तीन वर्षे कारावास
दुचाकीचोरीचा अपराध सिद्ध झाल्यास त्याला भादंविचे कलम ३७९ अन्वये तीन वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. भादंविचे कलम ३८० अन्वये सात वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. यंदा कोरोनामुळे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. नेमकी किती जणांना शिक्षा झाली, हे कळू शकले नाही.
कोट
शहरातून चोरलेले दुचाकी ही ग्रामीण भागात किंवा वर्धा, वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात विक्री करण्यात येत असल्याची माहिती काही गुन्ह्यांमध्ये निदर्शनास आले. आतापर्यंत पाच दुचाकी चोरणाऱ्या टोळ्या पकडल्या. त्यामध्ये इतर जिल्ह्यातीलसुद्धा दुचाकी रिकव्हर करण्यात आल्या.
आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती