महिनाभरात हृदयविकाराचे ३१ रुग्ण; प्रथिनांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:38 PM2019-01-23T22:38:41+5:302019-01-23T22:39:04+5:30
व्यस्त जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच महिन्यात ३१ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : व्यस्त जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच महिन्यात ३१ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात डिसेंबर महिन्यात ३१ हृदयविकाराचे, ६ रुग्ण विष प्राशन केलेले, सर्पदंशाचा एका रुग्णाने उपचार घेतला. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण शरीरात वाढत आहे, तर प्रथिनांचे प्रमाण कमी होत आहे. त्यातच कामांची व्यस्तता, हायपरटेन्शनमुळे हृदयाचा आकार वाढतो. कंपण वाढल्याने रक्तवाहिनीतून जलद गतीने रक्त प्रवाहित होतो. मात्र, वाढते कोलेस्ट्रॉलमुळे वाहिन्यांतून रक्त सुरळीत प्रवाहित होत नसल्याने अचानक हृदयविकाराचा झटका येतो, असे डॉ. दीपक शेंडे म्हणाले. हृदयविकार हा वेगवेगळ्या कारणांनी होतो. काहींना आनुवंशिक तर काहींना हायपर टेन्शन, खाणपान आदी कारणांमुळे हा आजार जडतो. त्यावर उपाय म्हणून नेहमी व्यायाम, योगा, घाम गळण्याइतपत चालणे, काम करताना तणावात न राहणे, नियमित जेवण, झोप घेणे गरजेचे आहे. नेहमी सकारात्मक विचार अंगिकारल्यास कुठलाही आजार होणार नाही.
अतिदक्षता विभागात अद्ययावत उपकरणांद्वारे उपचार
अद्ययावत उपकरणे उपलब्ध झाल्याने रुग्णांची गैरसोय थांबली आहे. मध्य प्रदेश व मेळघाटातून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची सोय व्हावी, या उद्देशाने येथे अद्ययावत सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेषत: अतिदक्षता विभागात अद्ययावत उपकरणे, चार वर्ग-१ चे डॉॅक्टर्स अनुक्रमे सतीश हुमणे, दीपक शेंडे, प्रीती मोरे, संदीप सुकसोळे कार्यरत आहेत. सहा ट्रेन नर्सिंग स्टाफ असून दोन इंचार्ज नियमित असतात.
२३ दिवसांत २३ रुग्णांची नोंद
इर्विन रुग्णालयात १ ते २३ जानेवारी दरम्यान २३ रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची नोंद झाली आहे. विष प्राशन केलेल्या ३ रुग्णांची व सर्पदंशाचा एक रुग्ण सध्या उपचार घेत आहे.
आरोग्य संतुलित राहण्यासाठी कार्बोहायड्रेट्स कमी व प्रथिनांचे प्रमाण अधिक असावे. मात्र, आता याउलट स्थिती निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराच्या आजारात सर्वाधिक वाढ झाली आहे.
- विलास पाटील,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक