महापालिकेच्या ३१ कर्मचाऱ्यांची वेतनकपात
By admin | Published: April 7, 2017 12:12 AM2017-04-07T00:12:27+5:302017-04-07T00:12:27+5:30
मनपातील ६१ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड ओढल्यानंतर दुसऱ्या दिवशीही कारवाईचा सिलसिला कायम राहिला.
आयुक्त आक्रमक : लेटलतिफांचे धाबे दणाणले
अमरावती : मनपातील ६१ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड ओढल्यानंतर दुसऱ्या दिवशीही कारवाईचा सिलसिला कायम राहिला. उपायुक्तद्वयांच्या पाहणीत गैरहजर ३१ कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतनकपात करण्यात आली. बुधवारी ६१ कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी दिले होते.
दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचणाऱ्या आयुक्तांना अधिनस्थ यंत्रणा सकाळी दहालाच हजर हवी आहे. मात्र, मागील काही दिवसांत बहुतेक कर्मचारी सकाळी दहा वाजता कार्यालयात पोहोचत नसल्याचे निरीक्षण नोंदवून आयुक्तांनी त्यासाठी कार्यालयीन परिपत्रक काढले. मात्र,अनेकांनी त्या परिपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने लेटलतिफांवर कारवाई करण्यात आलीे. गुरूवारी उपायुक्तद्वय औगड व वानखडे यांनी सकाळच्या सत्रात बाजार परवानासह झोन क्र. ३,निलंबित कर्मचाऱ्यांसह एनयूएलएम विभागाचा आढावा घेतला. यात ३१ कर्मचारी गैरहजर आढळले. यात ७ निलंबित कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे यांनी तसा अहवाल दिल्यानंतर उपरोक्त कर्मचाऱ्यांची ६ एप्रिलची अनुपस्थिती विनावेतन करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने याची नोंद घेऊन एप्रिलच्या वेतनातून उपरोक्त कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतनकपात करण्यात यावी व तसा पूर्तता अहवाल सादर करावा, असा आदेश आयुक्तांनी गुरूवारी पारित केले.
तर पूर्वसूचनेशिवाय वेतनकपात
अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेवर कार्यालयात उपस्थित होत नाहीत व त्याअनुषंगाने वेळोवेळी सूचना व निर्देश देण्यात आले आहेत. तरीही बहुतांश अधिकारी-कर्मचारी हे विहित वेळेत कार्यालयात उपस्थित होत नाहीत. हे विचारात घेता यापुढे विहित वेळेत उपस्थित न होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस अथवा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे त्यादिवसाचे वेतन देय होणार नाही, असे आयुक्त हेमंत पवार यांनी स्पष्ट केले आहे.