३१ लाखांचा अपहार, दोन कर्मचारी बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 05:00 AM2020-03-08T05:00:00+5:302020-03-08T05:00:11+5:30
आयुक्त संजय निपाणे यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केले. बाजार परवाना विभागात सन २०१२ मध्ये अनुकंपा तत्त्वावर लिपिक या पदावर नोकरीवर लागलेला स्वप्निल महल्ले याने पावती पुस्तक क्रमांक २८ व त्याला हस्तांतरित करण्यात आलेल्या अन्य पुस्तकांद्वारे वसुलीमध्ये २ लाख ८४ हजार ७५० रुपयांचा अपहार केला तसेच पावत्यांद्वारे वसूल केल्या २९ लाख ६४ हजार ७२३ रुपयांचा भरणा केलाच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या बाजार परवाना विभागात ३१ लाखांच्या अपहार प्रकरणात निलंबित असलेले स्वप्निल साहेबराव महल्ले व हरिराम मोतीराम शेलूकर यांच्यावर विभागीय चौकशीत दोष सिद्ध झाला. त्यामुळे आयुक्त संजय निपाणे यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केले.
बाजार परवाना विभागात सन २०१२ मध्ये अनुकंपा तत्त्वावर लिपिक या पदावर नोकरीवर लागलेला स्वप्निल महल्ले याने पावती पुस्तक क्रमांक २८ व त्याला हस्तांतरित करण्यात आलेल्या अन्य पुस्तकांद्वारे वसुलीमध्ये २ लाख ८४ हजार ७५० रुपयांचा अपहार केला तसेच पावत्यांद्वारे वसूल केल्या २९ लाख ६४ हजार ७२३ रुपयांचा भरणा केलाच नाही. अन्य एका प्रकरणात वसूल केलेल्या २ लाख ३४ हजार रुपयांच्या पावत्यांवर उपरी लेखन करून त्याच्या तुलनेत कमी रकमेचा भरणा केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. याव्यतिरिक्त वसूल केलेल्या १० लाखांच्या रकमेचा उशिरा भरणा केलेला आहे. या सर्व अपहार प्रकरणात त्याचे निलंबित करण्यात आले व विभागीय चौकशी करण्यात आली. यात तो दोषी आढळल्याने त्याला शनिवारी बडतर्फ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याच विभागात सन २००४ मध्ये कुली या पदावर नियुक्त हरिराम मोतीराम शेलूकर याला लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्याने इतवारा बाजार ओटे वसुलीच्या पावत्यांमध्ये खोडतोड करून १ लाख ४७ हजार २३८ रुपये व दुसºया प्रकरणात इतवारा बाजारातील वसुलीमध्ये ९६ हजार ६९२ रुपयांचा अपहार केला तसेच ४९ हजार ५७२ रुपयांची रक्कम मागणी रजिस्टरमध्ये स्वत:च्या अधिकारात कमी केली. या प्रकरणात त्याला ११ जूनमध्ये निलंबित करण्यात येऊन आयुक्तांचे आदेशाने कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण यांनी विभागीय चौकशी केली. यामध्ये सेलूकर दोषी आढळल्याने त्याच्या बडतर्र्फीचे आदेश आयुक्तांनी काढले.
दैनंदिन वसुलीच्या भरण्यावर प्रश्नचिन्ह
ज्या विभागात पावती पुस्तकाद्वारे वसुली केली जाते, त्या ठिकाणी रोज वसुली किती झाली व संबंधित लिपिकाने या वसुलीचा भरणा केला आहे का, याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही संबंधित निरीक्षक व अधिकाऱ्यांची आहे. मात्र, बाजार परवाना विभागात याला सोयिस्कर बगल दिली जाते. त्यातूनच अफरातफरीचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे ज्या कर्मचाºयांकडे रोखीचे व्यवहार आहेत, त्यांच्या रोजच्या वसुलीची पडताळणी रोज किंवा दुसºया दिवशी होणे महत्त्वाचे झाले आहे.