३८४ गावांमध्ये ३१ हजार हेक्टरचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:39 PM2018-02-13T22:39:13+5:302018-02-13T22:40:28+5:30
जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळासह अवकाळी पाऊस, गारपीटमुळे ८ तालुक्यांत ३५ महसूल मंडळांतील ३८४ गावांमध्ये ३० हजार ७२७ हेक्टरमधील रबी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळासह अवकाळी पाऊस, गारपीटमुळे ८ तालुक्यांत ३५ महसूल मंडळांतील ३८४ गावांमध्ये ३० हजार ७२७ हेक्टरमधील रबी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रविवारी सकाळी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात अवकाळी पाऊस पडला. वादळासह वीज व गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये रबी हंगामाचा गहू जमिनीवर पडला, तर गाठ्यावर आलेल्या हरभऱ्याला गारपीटचा मार बसला. कांदा व भाजीपाला पिकांचे गारपीटने मोठे नुकसान झाले. संत्र्याच्या मृग बहराची फळगळ झाली, तर आंबिया बहरदेखील गळाला. यंदा प्रथमच आंबा मोठ्या प्रमाणात मोहोरला होता. या मोहोराचेदेखील गारपीटने नुकसान झाले. पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांनी रविवारी या आपत्तीचा आढावा घेऊन तत्काळ पाहणी करण्याच्या सूचना क्षेत्रिय यंत्रणेला दिल्यात. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल सोमवारी सर्व तहसीलदारांनी पाठविला. यामध्ये पाऊस जरी सर्व तालुक्यात झाला असला तरी गारपीट मात्र आठ तालुक्यांत झाल्याने या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. रविवारी सर्वाधिक २५.५ मिमी पाऊस अचलपूर तालुक्यात २५ मिमी वरूड १४.८ अंजनगाव सुर्जी, १७ मिमी मोर्शी, १०.४ मिमी भातकुली, १० मिमी पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात पडल्याची नोंद आहे.
वरुड-मोर्शी संत्रा,गव्हाचे नुकसान
वरुड/मोर्शी : तालुक्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले असून सोमवारी गावसर्वेक्षणाचे रिपोर्ट महसूल विभागाला मिळाले आहे. यामध्ये ८५ हेक्टर शेतजमीनीवरील पिकांचे नुकसान झाले, तर वावरुळी परिसरात संत्रा गळाले. मोर्शी तालुक्यातही संत्रा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्यास सुरूवात झाली आहे. पाळा शिवारासह तालुक्यातील संत्रा उत्पादकांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
असे आहे तालुकानिहाय नुकसान
मोर्शी तालुक्यात तीन महसूल मंडळांतील ४० गावांमध्ये २,५०४ हेक्टर, वरूड तालुक्यातील सहा महसूल मंडळांतील ६ गावांमध्ये ५० हेक्टर, चांदूर बाजार तालुक्यातील सात महसूल मंडळांतील १५४ गावांमध्ये १७,१०३ हेक्टर, अचलपूर तालुक्यात पाच महसूल मंडळातील ५७ गावांमध्ये ६,३७५ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात दोन महसूल मंडळात १७ गावांतील ४३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात पाच महसूल मंडळांमध्ये ४,५२५ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात चार महसूल मंडळांतील ६ गावांमध्ये १६ हेक्टर, तर धारणी तालुक्यात चार महसूल मंडळातील २० गावांमधील ११० हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे.
घुईखेड परिसरात दीडशे हेक्टर गव्हाचे नुकसान
रविवारच्या वादळी पावसाचा घुईखेड भागातील २२ गावांना फटका बसला. परिसरातील गहूू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. जि.प सदस्या राधिका घुईखेडकर यांनी परिसराचा दौरा करून शासनाकडे त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील घुईखेड भागात रविवारी मध्यरात्री वादळी पावसाने कहर केला. या भागातील निंभा, दानापूर, धोत्रा, मोगरा, टीटवा, बग्गी, जावरा, टोंगलाबाद, किरजवळा येथील गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वादळी पावसाने आमच्या तोेंडचा घास हिसकविल्याच्या व्यथा शेतकºयांनी डोळ्यात पाणी आणत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर व जि.प सदस्य राधिका घुईखेडकर यांच्याजवळ मांडल्या.
दर्यापुरात अवकाळीने मोठे नुकसान
दर्यापूर : तालुक्यात अवकाळी पावसाची वक्रदृष्टी कायम असून रविवारनंतर सोमवारीदेखील तालुक्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने जगावे कसे, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित झाला आहे. खरिपाचे पीक हातचे गेल्यानंतर सारी मदार रबी पिकावर होती. गंजीतला हरभरा पाण्यात ओला झाल्याने काळा पडण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. तालुक्यातील दारापूर, वडनेर गंगाई या जि.प. सर्कलमध्ये अधिक प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.