पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ३१.४० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:59+5:302021-05-10T04:12:59+5:30
दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत ...
दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ६ मे पर्यंत जलंसपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी फक्त ३१.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चिंता वाढली आहे. तशी सद्यस्थितीत टंचाई नसली तरीही एक महिना पाणी जपून वापरा, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ३६.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला होता. म्हणून, आतापर्यंत कुठेही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ३५.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर ४७७ लघू प्रकल्पांत २२.८ टक्के पाणीसाठा आहे.
५११ प्रकल्पांचा उपयुक्तसाठा हा ३२८२.६० दलघमी एवढा आहे. त्यापैकी आजचा उपयुक्तसाठा हा १०३१.०५ टक्के आहे. त्याची सरासरी ३१.४० टक्के एवढी आहे.
बॉक्स:
नऊ मोठ्या प्रकल्पाची स्थिती
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सर्वाधिक ४७.७५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात २६.५७ टक्के, अरुणावती २६.२३ टक्के, बेंबळा ४२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ३३.५४ टक्के, वाण ३८. ३० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३२.०३ टक्के, पेनटाकळी २२.९९ टक्के, खडकपूर्णा सर्वात कमी ४.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाचीही अशीच स्थिती आहे.