गुरुवारी पुन्हा ३१५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:13+5:302021-02-12T04:13:13+5:30
अमरावती : कोविड लसीकरणाला वेग आला असताना दुसरीकडे कोरोना संसर्गाची आकडेवारी उच्चांक गाठत आहे. आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गुरुवारी ...
अमरावती : कोविड लसीकरणाला वेग आला असताना दुसरीकडे कोरोना संसर्गाची आकडेवारी उच्चांक गाठत आहे. आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गुरुवारी पुन्हा ३१५ पॉझिटिव्ह आढळून आले, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ४२८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. २४ हजार १५० संक्रमितांची संख्या नोंदविली आहे. नवीन वर्षात दरदिवशी वाढत्या संक्रमित रुग्णसंख्येने प्रशासन हैराण झाले आहे.
कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी आराेग्य यंत्रणेचा आढावा घेताना उपाययोजनांवर भर दिला आहे. ‘हाय रिस्क’ घोषित क्षेत्राला आता लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचे पाऊल उचलले जात आहे. मात्र, कोरोना लस आल्यानंतर प्रशासन आणि नागरिकही बेफिकिरपणे वागत आहे, मध्यंतरी कोणीही मास्क वापरत नाही, असे चित्र अनुभवता आले. परंतु, नवीन वर्षात कोरोना संसर्ग वेगाने वाढताच आता जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’ वर आले आहे. महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाने त्रिसूत्रीचे पालन होण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. एकीकडे उपाययोजनांचे नियोजन चालविले जात असताना कोरोना संक्रमित रुग्णांची आकडेवारी कमी होण्याचे नाव घेत नाही, हे गुरुवारी ३१५ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्पष्ट होते.
-----------------
४३९ रूग्ण दाखल, १५५ बरे हाेऊन घरी परतले
कोरोना संसर्गाची आकडेवारी कमी होत नाही. गुरूवारी ३१५ पॉझिटिव्ह आढळून आले असताना ४३९ रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर, १५५ रूग्णांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. आतापर्यत गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात ३१३७ तर, ग्रामीण क्षेत्रात १८०९ रूग्ण असल्याची नोंद आहे. गुरूवारी ॲक्टिव्ह रूग्ण संख्या ९३७ एवढी होती. एकूण नमुने १ लाख ८८ हजार ९२३ तपासले आहेत.