३२ ग्रामपंचायतींना हक्काचा अभियंता
By admin | Published: November 19, 2014 10:31 PM2014-11-19T22:31:35+5:302014-11-19T22:31:35+5:30
अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात.
अमरावती : अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात. यामुळे विकासात अडसर निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींना हक्काचे अभियंता कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले आहेत. त्यामुळे तेथील कामांना वेग येणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामांचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास उशीर लागतो. यासाठी शासनाने ग्रामपंचायतस्तरावर विकासकामांचे मूल्यांकन होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील. या हेतूने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या विविध विकास कामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करतील. त्याचबरोबर त्याकामांची निविदा प्रक्रिया राबवून कामपूर्ण होईपर्यंत देखरेख करणे, तसेच कामाच्या मूल्यांकनासह पूर्णत्वाचा दाखलाही हे अभियंते देणार आहेत. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये या अभियंत्यांची निवड केली आहे. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी केली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अभियंता नियुक्त करण्यात आल्यामुळे विकास कामांना वेग येणार आहे. त्यामुळे वाडी, वस्त्याच्या विकासाला चालना मिळू शकेल. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांसाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख ही कामे त्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)