प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयात ३२ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 07:45 PM2019-11-07T19:45:20+5:302019-11-07T19:45:23+5:30
नाशिकच्या अखत्यारितील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय धारणी येथील कार्यालयात सुमारे ३२ लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघड झाला आहे.
धारणी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिकच्या अखत्यारितील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय धारणी येथील कार्यालयात सुमारे ३२ लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघड झाला आहे. याप्रकरणी गुरुवारी धारणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
मेळघाटातील आदिवासी बांधवांना राज्य शासनाकडून मोफत गॅस युनिट संच वाटप करण्याकरिता आले होते. त्यापैकी निवडक आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देऊन उर्वरित लाभार्थ्यांना वाटप न करता तत्कालीन तीन प्रादेशिक व्यवस्थापक व वीजतंत्री असलेल्या एका कर्मचाºयाने त्यात ३१ लाख ८१ हजार १६० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार सध्या विद्यमान प्रादेशिक व्यवस्थापक यांनी गुरुवारी धारणी पोलिसांत केली आहे.
राज्य शासनाकडून सन २००४ ते २००९ पर्यंतच्या कालावधीत मेळघाटातील आदिवासी बांधवांना मोफत गॅस युनिट संच वाटपाची योजना राबविण्यात आली. या योजनेत ६३ हजार २ लाभार्थ्यांना गॅस युनिट संच मंजूर झाले होते. सन २०१२-१३ या कालावधीत गायकवाड समितीने चौकशी केली असता ११८७ गॅस यूनिट संच वाटप न केल्याचे निष्पन झाले. तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक श्याम नारायण मून, नामदेव मेश्राम, डी.आर. वाघमारे, वीजतंत्री चंद्रकांत भलावी या चौघांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला. त्याबाबत ७ नोव्हेंबर रोजी प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलवार यांनी धारणी पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीअंती चौघांविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.