अमरावती विभागात आरटीओचा ३२३ कोटींचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 07:38 PM2018-04-19T19:38:08+5:302018-04-19T19:38:08+5:30
परिवहन विभागाने आरटीओला अमरावती विभागासाठी २७९ कोटी ६८ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ३२२ कोटी ७० लक्ष ९८ हजारांचा महसूल गोळा करून ११५ टक्के वसुली केली.
- संदीप मानकर
अमरावती - परिवहन विभागाने आरटीओला अमरावती विभागासाठी २७९ कोटी ६८ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ३२२ कोटी ७० लक्ष ९८ हजारांचा महसूल गोळा करून ११५ टक्के वसुली केली. ८३ कोटी ३ लाख २८ हजारांची सर्वाधिक वसुली यवतमाळ जिल्ह्याने केली आहे. ही टक्केवारी १२५ टक्के आहे.
आरटीओ विभाग विविध वाहनांवरील कारवाया, दंडात्मक रक्कम, तडजोड शुल्क, विविध वाहनांच्या नोंदण्या तसेच इतर अनेक प्रकारचे कर आकारत महसूल गोळा करतो. यामध्ये अमरावती विभागात वर्षभरात ५६ हजार २५२ वाहनांची तपासणी करण्यात आली होती. तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या वाहनांची संख्या ही १८ हजार ८४ आहे. त्यामध्ये तडजोड शुल्कांची उद्दिष्टे हे ८५२.०० लक्ष होते. तर तडजोड शुल्कपोटी ७६०.९२ लक्ष पाचही जिल्ह्यांमध्ये आकारण्यात आले. विविध प्रकारच्या थकीत करांची रक्कम ही १६५.८४ लक्ष होती. त्यापैकी १३७.१७ लक्ष वसूल करण्यात आली. यासाठी आरटीओने विविध पथक स्थापन करून कारवायांचा सपाटा लावला होता. त्यामुळे मागील वर्षीच उद्दिष्ट प्राप्त होऊ शकली, हे विशेष!
सर्व जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी चांगली कामगिरी करून उद्दिष्ट तर पूर्ण केले; त्यापेक्षाही ११५ टक्के महसूल मिळविण्यात यश आले आहे. यासाठी पथकही तयार केले होते.
- रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.