संघटना आक्रमक; ३२८ कृषी सहायक सामूहिक रजेवर, कामकाज खोळंबले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 31, 2023 07:34 PM2023-10-31T19:34:00+5:302023-10-31T19:34:15+5:30
कालबद्ध आंदोलनाचा कृषी विभागाला जबर फटका
अमरावती: बुलडाणा जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या सहा कृषी सहायकांना मुळ कार्यालयात परत आणा, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील ३२८ कृषी सहायकांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. यासाठीच्या कालबद्ध आंदोलनात मंगळवारपासून सर्व कृषी सहायक सामूहिक रजेवर गेल्याने कृषी विभागाचे बहुतांश कामकाज प्रभावित झाले आहे.
दर्यापूर तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या योजनेचे लक्षांक पूर्ण न झाल्याने सहा कृषी सहायकांना शिक्षा म्हणून बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या अमरावती जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष गजेंद्र मोहोड यांच्या नेतृत्वात विभागीय कृषी सहसंचालकांची भेट घेतली. त्यावेळी या कृषी सहाय्यकांना एक महिन्यात परत बोलावू, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात टाळाटाळ केल्या जात असल्याचा आरोप संघटनेनी केला आहे.
त्यामुळे संघटनेद्वारा २६ ऑक्टोबरपासून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आलेले आहे. यामध्ये ३१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर गेल्याने कृषी विभागाला चांगलाच फटका बसला आहे.