बुध ग्रहाचे ३३ दिवस दर्शन दुर्लभ; अवलोकन करण्यासाठी दुर्बीणीची आवश्यकता
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 21, 2024 05:03 PM2024-09-21T17:03:05+5:302024-09-21T17:03:59+5:30
खगोलीय घटना : १९ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत सूर्याच्या सान्निध्यात
अमरावती : सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा सूर्याच्या सान्निध्यात राहणार असल्याने १९ सप्टेंबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत आकाशात दिसणार नाही, तसाही हा आंतरग्रह असल्याने नेहमीच सूर्याच्या सान्निध्यात असतो. त्यामुळे पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर फार कमी वेळ दिसत असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.
ही एक खगोलीय घटना आहे. ४ किंवा ६ इंच टेलिस्कोपमधून हा ग्रह ठिपक्यासारखा दिसतो. सध्या हा ग्रह कन्या राशीत असून १९ ऑक्टोबरला तूळ राशीत असेल, त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये हा ग्रह संध्याकाळी पश्चिम आकाशात दिसू शकेल. याचे अवलोकन करण्यासाठी दुर्बिण असल्यास अधिक उत्तम निरीक्षण करता येणार आहे.
सन १९७४ मध्ये पहिले मानवरहित यान ‘मरिनर-१०’ या ग्रहावर गेले तर सन २००८ मध्ये ‘मेसेंजर’ या यानाने बुधाचा अभ्यास केला. या ग्रहावर ‘द स्पायडर’ नावाचे सर्वात मोठे विवर आहे. टेलिस्कोपमधून या ग्रहाच्या चंद्राप्रमाणे सुंदर कला दिसत असल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
सूर्यापासून बुधाचे अंतर ५.८ कोटी किमी
बुध हा ग्रह सूर्यापासून जवळचा ग्रह आहे. या ग्रहाला उपग्रह नाही. हा ग्रह सूर्याला ८८ दिवसात एक चक्कर मारतो म्हणजेच सर्वात वेगवान ग्रह आहे. सूर्यापासून या ग्रहाचे अंतर हे ५.८ कोटी किमी असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.