अमरावतीमधील ३३ टक्के पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 08:26 PM2018-09-01T20:26:22+5:302018-09-01T20:28:46+5:30
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अमरावती महापालिकेला पत्र दिले होते.
वैभव बाबरेकर
अमरावती : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. मे महिन्यात ३३ टक्के दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यावर उपाययोजनासंदर्भात अमरावती महापालिकेला पत्र दिले होते. दूषित पाण्याची वाढती टक्केवारी ८ लाख अमरावतीकरांसाठी धोक्याचीच घंटा मानली आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असून रोगराई पसरण्याची शक्यताही वाढते. शहरात सध्या या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगीमध्ये आबालवृद्धांचा ओघ वाढत आहे. याला दूषित पाणीच कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. अमरावती महापालिकेकडून शहरातील उपहार गृह, विहिरी, शाळा-महाविद्यालये, मंगल कार्यालये, कॅन, शीतपेयगृहे, कुपनलिका-बोअरवेलसह अन्य पाणी स्त्रोतांचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जातात. त्यात दर महिन्याला पाणी नमुने दूषित आढळून येत आहे. जुलै महिन्यात आरोग्य प्रयोगशाळेकडून महापालिका हद्दीतील दवाखान्यांचे २०८ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी २६ नमुने दूषित आहेत. या अनुषंगाने पुणे येथील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे तत्कालीन उपसंचालक (आरोग्य सेवा) सुहास बाकरे यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यात महापालिका क्षेत्रात ३३ टक्के पाणी दूषित आढळल्याने जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवून उपायायोजना करण्याचे निर्देश दिले आहे.
एप्रिल ते जुलैपर्यंतची दूषित पाण्याची आकडेवारी
- सार्वजनिक नळ १९७ पैकी २३ दूषित
- खासगी नळ १३ पैकी ५ दूषित
- सार्वजनिक विहिरी ८१ पैकी ३१ दूषित
- हॉटेल ११३ पैकी २९ दूषित
- शाळा-महाविद्यालये ३८ पैकी २२ दूषित
- शीतपेयगृह १६ पैकी २ दूषित
- मंगल कार्यालये १६ पैकी ४ दूषित
-चाट भंडार ९ पैकी ३ दूषित
-कॅनच्या २६ पैकी ८ दूषित
-हातपंप व बोअर ३९ पैकी १८ दुषित
-इतर ७१ पैकी ९ दुषित
१५२ जणांना नोटीस, १६ जणांकडून दंड वसुली
दूषित पाणी आढळलेल्या १५२ जणांना महापालिकेकडून नोटीस बजावली असून, १६ जणांकडून दंड वसुलण्यात आला आहे. दूषित नमुने आढळलेली उपाहारगृहे, प्रतिष्ठान, संस्थांना महापालिका नोटीस बजावते, त्यानंतरही पाणी दूषित आल्यास दंड ठोठावते.
दूषित पाणी आढळल्यास नोटीस व दंड
दूषित पाणी आढळलेल्या आस्थापनाला महापालिकेकडून नोटीस व दंड ठोठावण्यात येते. मात्र, नोटीस व दंड दिला जात असतानाही दूषित पाणी आढळूनच येत नाही. त्यामुळे पाणी शुद्धतेबाबत महापालिका अमरावतीकरांना केव्हा हमी देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाणी नमुने दूषित आढळल्यास संबंधित आस्थापनाला नोटीस बजावण्यात येते. पुन्हा पाणी दूषित आढळल्यास दंड दिला जातो. पाण्याची शुद्धता ठेवण्यासाठी सक्त ताकिद दिली जाते.
- सीमा नैताम, आरोग्य अधिकारी, महापालिका
दूषित पाणी आढळल्यास आमच्याकडून संबंधित महापालिकेला उपाययोजनांसाठी पत्र दिले जाते. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनीही कळविण्यात येते.
- तानाजी माने,
उपसंचालक, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे